spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कामठीत कापड व्यावसायिकाचा संशयास्पद मृत्यू; बंद घरात मृतदेह, औषधे व इंजेक्शन आढळल्याने गूढ वाढले

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोदी पडाव, अशोक नगर येथे मंगळवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली. येथील कापड व्यावसायिक शैलेश देविदास रोडगे (वय ५८) यांचा त्यांच्या राहत्या घरात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ औषधांच्या गोळ्या व इंजेक्शन पडलेले असल्याने या मृत्यूभोवती गूढ निर्माण झाले असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश रोडगे यांच्या मुलगी जर्मनीमध्ये, तर मुलगा हैदराबाद येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. पत्नी नागपूर येथे खासगी नोकरी करीत असून पती-पत्नी कामठीतील घरी राहत होते.

मंगळवारी सकाळी पत्नी कामावर गेल्यानंतर रोडगे घरी एकटेच होते. दुपारपर्यंत त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने हैदराबाद येथील मुलाने वारंवार मोबाईलवर फोन केला; मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले.

शेजाऱ्यांनी घराजवळ पोहोचल्यावर मुख्य दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. संशय बळावल्याने त्यांनी तातडीने जुनी कामठी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता शैलेश रोडगे यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळ औषधे आणि इंजेक्शन विखुरलेल्या अवस्थेत असल्याचेही निदर्शनास आले.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून तो नैसर्गिक आहे, औषधांच्या अतिरेकामुळे झाला आहे की अन्य कोणते कारण आहे, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून जुनी कामठी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.