– विद्युत प्रवाहाचा संशय, सात अटकेत
गोंदिया :- नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नागझिरा अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये वाघाचा मृतदेह आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासणीत वाघाचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वनविभागाने सात संशयितांना अटक केली असून, मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. नागझिरा खंडाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे यांनी ही माहिती दिली.
सामूहिक गस्तीवेळी आढळला मृतदेह
१० नोव्हेंबर २०२६ रोजी नागझिरा कोअर सहवनक्षेत्रातील थाटेझरी बिटाच्या कक्ष क्रमांक ९९ मधील राखीव वनक्षेत्रात वनकर्मचारी सामूहिक गस्त घालत होते. यावेळी त्यांना वाघ मृतावस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक पियुष जगताप, नागझिरा खंडाचे उपसंचालक प्रीतमसिंग कोडापे, सहायक वनसंरक्षक विपीन लांडगे, गस्ती पथकप्रमुख महेंद्र भांगरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी ए. व्ही. लांबट यांनी घटनास्थळी धाव घेतली.
एनटीसीएच्या नियमानुसार तपासणी
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) प्रमाणित कार्यपद्धतीनुसार विशेष समिती स्थापन करून मृत वाघाची तपासणी करण्यात आली. या समितीत मानद वन्यजीव रक्षक सावंत बहेकार, एनटीसीएचे प्रतिनिधी रुपेश निवाते, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाचे सदस्य इद्रिस अहमद आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश होता. समितीच्या उपस्थितीत पशुवैद्यकीय पथकाने वाघाचे शवविच्छेदन केले. प्राथमिक निरीक्षणात विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सर्व अवयव सुरक्षित; व्हिसेरा नमुने संकलित
शवविच्छेदनादरम्यान वाघाचे सर्व अवयव सुस्थितीत आणि साबूत असल्याचे आढळले. पुढील वैज्ञानिक तपासणीसाठी व्हिसेरा नमुने संकलित करण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर पंचांच्या उपस्थितीत मृत वाघाचे दहन करण्यात आले. दरम्यान, सात संशयितांना अटक करण्यात आल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. वाघाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला विद्युत प्रवाहाचा स्रोत आणि त्यामागील संभाव्य कारणांचा शोध वनविभाग घेत आहे.
वनविभागाचे चार ट्रॅप कॅमेरे चोरीला
दरम्यान, अर्जुनी-मोरगाव वनपरिक्षेत्रात अखिल भारतीय व्याघ्रगणना २०२६ अंतर्गत लावण्यात आलेले चार ट्रॅप कॅमेरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ३ ते ४ नोव्हेंबरदरम्यान महागाव बिटातील बुटाई तसेच बोंडगाव/देवी बिटातील बोदरा जंगल परिसरातून ही चोरी झाली. चोरीस गेलेल्या कॅमेऱ्यांची किंमत सुमारे ६० हजार रुपये आहे.याप्रकरणी वनरक्षक अमित भिवाजी शहारे यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हवालदार मेंढे पुढील तपास करीत आहेत. एकीकडे अभयारण्यात वाघाचा संशयास्पद मृत्यू, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी लावलेल्या कॅमेऱ्यांची चोरी, या घटनांमुळे वन्यजीव संरक्षण आणि जंगलातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त होत आहे.






