spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शाळा बंद ठेवून शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

अमरावती :- शिक्षक संघटनांच्या मागण्यांची सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने आज शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेऊन ‘शाळा बंद’ आंदोलन केले.मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत, मागण्यांचे निवेदन सादर केले.शाळा बंद करून कोणालाही वेठीस धरण्याचा शिक्षकांचा हेतू नव्हता किंवा नाही; तर विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या संबंधात शासनाने अनुकूल निर्णय घ्यावा हाच एकमेव उद्देश आहे, अशी माहिती आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

प्राथमिक शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्यासंबंधाने राज्य शासनाने शिक्षकांच्या संरक्षणार्थ भूमिका घेऊन न्याय द्यावा. टीईटी अनिवार्यतेच्या नावाखाली थांबविलेली पदोन्नती प्रक्रिया तातडीने सुरु व्हावी. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. संचमान्यता शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ तसेच कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद (समायोजित) करण्याचे धोरण रद्द करून बालकांच्या शिक्षणाची हेळसांड थांबवावी.

शिक्षण सेवक योजना बंद करून पूर्ण वेतनावर नियमित शिक्षक भरती पूर्वलक्षी प्रभावाने सुरु करावी. सर्व विषय पदवीधर शिक्षकांना भेदभाव न करता पदवीधर वेतनश्रेणी लागू करावी. राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरु करावी. दैनंदिन अध्यापन कार्य प्रभावित करणारी शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनास अडसर ठरणारी बीएलओ सह ऑनलाईन / ऑफलाईन कामे बंद करावी. पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवा प्रथम नियुक्तीपासून पेन्शनसह सर्व प्रयोजनासाठी ग्राह्य धराव्यात. ग्रामीण भागात सेवारत जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी मुख्यालयी शासनाने निवासस्थाने बांधून द्यावीत, इत्यादी मागण्या मांडण्यात आल्या.

मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर अनुकूल असा प्रतिसाद दिसून येत नाही. वारंवार संघटनांच्या माध्यमातून पत्र व्यवहार करून, भेटी घेऊनही दुर्लक्ष कायम आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविले जात नाही. शाळांचे अस्तित्व धोक्यात येत असतानाही त्याबाबत अनुकूल असे निर्णय होत नाही. शिक्षकांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे भविष्य अंधःकारात ढकलल्या जाणाऱ्या टीईटी सारख्या प्रश्नावर शिक्षकांना न्याय देण्याच्या बाबतीत कमालीचे दुर्लक्ष होत असल्याने राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संतप्त भावना आहेत. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षक समितीचे अजयानंद पवार, शैलेन्द्र दहातोंडे, राजेश सावरकर, गोकुलदास राऊत, संभाजी रेवाळे, प्रवीणा कोल्हे, प्रशांत निमकर, नंदकीशोर पाटील, मनीष काळे, सरीता काठोळे, विनिता घुलक्षे, सुषमा वानखडे, भावना ठाकरे, आल्हाद तराळ यांनी दिला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.