spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी द्यावे संपूर्ण ज्ञान – प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार यांचे प्रतिपादन

– विद्यापीठ पदव्युत्तर इतिहास विभागात एनईपी २०२० मध्ये इतिहास अभ्यासक्रम विषयावर कार्यशाळा

नागपूर :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी संपूर्ण ज्ञान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पदव्युत्तर इतिहास विभाग, आर. एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालय आणि इतिहास अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी इतिहास विभागाच्या सभागृहात ‘एनईपी २०२० मध्ये इतिहास अभ्यासक्रम’ या विषयावर कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत डॉ. कोंडावार मार्गदर्शन करीत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून मानव विज्ञान विद्या शाखा अधिष्ठाता तथा इतिहास विभाग प्रमुख डॉ. शामराव कोरेटी, इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. सुचिश्मिता मिश्रा, आर.एस. मुंडले धरमपेठ कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. मंजुश्री सरदेशपांडे, डॉ. सतीश चाफले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची महाराष्ट्रात २०२३-२४ या शैक्षणिक सत्रापासून अंमलबजावणी होत असताना इतिहास विषयाच्या अनुषंगाने होत असलेली चर्चा महत्वपूर्ण असून इतिहास नेहमी असतो तसेच इतिहास सर्वत्र असल्याचे डॉ. कोंडावार यांनी पुढे बोलताना सांगितले. एनईपी २०२० ची शालेय शिक्षणापासून पदव्युत्तर पदवी ते आचार्य पदवी पर्यंत रचना समजवून सांगताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी आपल्या मानसिकतेत बदल करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

एनईपी २०२० अंतर्गत कशाप्रकारे क्रेडिट दिले पाहिजे, मुख्य विषय तसेच अन्य विषय कशाप्रकारे विद्यार्थ्यांना घेण्याचे स्वातंत्र्य या नवीन धोरणाने दिले आहे. महाविद्यालयात असलेले विषय घेण्याची सक्ती शिक्षकांकडून केल्या जाते. मात्र, विद्यार्थ्याने आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा या हेतूने एनईपीने विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. एका महाविद्यालयात संबंधित विषय नसेल तर अन्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांना तो विषय शिकता यावा याकरिता काही महाविद्यालय मिळून क्लस्टर विद्यापीठ निर्माण करण्याची सरकारची संकल्पना असल्याचे डॉ. कोंडावार यांनी यावेळी सांगितले. देशात उच्च शिक्षणात शिक्षितांचे प्रमाण वाढावे याकरिता केंद्र शासन प्रयत्नशील असून २०३५ पर्यंत भारताचा जीईआर ५० टक्क्यांवर नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांनी मध्येच शिक्षण सोडले तरी त्याचा लाभ मिळणार आहे. प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अशी रचना आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत लवचिक असे एनईपी अंतर्गत नवीन धोरण तयार करण्यात आले आहे. अपूर्ण राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. विद्यापीठाला त्यांच्या मान्यतेनुसार काही डिजिटल अभ्यासक्रम देखील चालविता येणार आहे. पारंपारिक विषय शिकविण्यासह शिक्षकांनी भारतीय ज्ञान प्रणालीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देता यावे याकरिता पारंगत व्हावे. एकापेक्षा अनेक आंतरविद्या शाखेतील अभ्यासक्रम शिक्षकांना शिकविता यावे असा बदल शिक्षकांनी स्वतः मध्ये करण्याची गरज डॉ. कोंडावार यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक करताना मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी एनईपी २०२० वर कशाप्रकारे अंमल झाला. अभ्यासक्रमामध्ये कशाप्रकारे बदल करण्यात आले, याची माहिती इतिहास विषयाशी संबंधित सर्व शिक्षकांना व्हावी, यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. सुचिश्मिता मिश्रा यांनी मार्गदर्शन करताना इतिहास शिक्षक आणि अभ्यास मंडळ वेगळे नसल्याचे सांगितले. उपप्राचार्य डॉ. मंजुश्री सरदेशपांडे यांनी एनईपीमुळे सर्वच गोष्टी बदलल्या असून शिक्षकांनी आकलन करून यावर अंमल करण्याची गरज व्यक्त केली. विषय इतिहास विषयाशी संबंधित असलेले पुरातत्व तसेच संग्रहालय व्यवस्थापन आदी आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमातील विषय विद्यार्थ्यांनी शिकल्यास त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण होईल. त्याचप्रमाणे इतिहास हा वैशिष्ट्यपूर्ण विभाग असल्याचे त्या म्हणाल्या. उद्घाटनीय कार्यक्रमाचे संचालन डॉ अलिशा सहाय यांनी केले तर आभार डॉ. मृणालिनी रांगणे यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने इतिहास शिक्षकांची उपस्थिती होती.

विविध तांत्रिक सत्रात मार्गदर्शन

उद्घाटन कार्यक्रमानंतर विविध तांत्रिक सत्रांमध्ये एनईपी २०२० बाबत मार्गदर्शन करण्यात आले. प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान इतिहास अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुचिश्मिता मिश्रा यांनी भूषविले या सत्रात प्रियदर्शनी महिला महाविद्यालय वर्धा येथील डॉ. प्रियराज म्हैसकर, अभ्यास मंडळ सदस्य आर. एस. मुंडले धरमपेठ महाविद्यालय नागपूर येथील डॉ. सतीश चाफले, विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर येथील डॉ. विठोबा चंदनखेडे यांनी मार्गदर्शन केले. या सत्राचे संचालन डॉ. प्रदीप चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.स्वप्निल पाटील यांनी मानले. द्वितीय सत्राचे अध्यक्षस्थान मानव विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी यांनी भूषविले या सत्रामध्ये अण्णासाहेब गुंडेवार महाविद्यालयातील डॉ. रवींद्र लोणारे आणि व्हीएमव्ही महाविद्यालयातील डॉ. अविनाश अवचट यांनी मार्गदर्शन केले. संचालन डॉ. मृणालिनी रांगणे यांनी केले तर आभार डॉ. सचिन बोगेकर यांनी मानले. माजी विद्यार्थी सत्राचे अध्यक्षस्थान तायवाडे महाविद्यालय कोराडी येथील डॉ. शरद डवरे यांनी भूषविले या सत्रामध्ये शिवाजीनगर परिषद महाविद्यालय मोवाड येथील डॉ. प्रज्ञा कामडी, एम.बी. पटेल महाविद्यालय सालेकसा येथील डॉ. नामदेव हटवार, एस.एस.एन. जे. महाविद्यालय देवळी येथील डॉ. रफिक शेख व संताजी महाविद्यालय नागपूर येथील डॉ. श्रीकांत सोनटक्के यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन डॉ. रामभाऊ कोरेकर यांनी केले या कार्यक्रमात नवनियुक्त माजी विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला तर आभार डॉ. रवींद्र लोणारे यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.