spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पराभवाच्या भीतीपोटी जुळवून आणलेले ठाकरे बंधूंचे ‘भीती संगम’ नाटक फ्लॉप ठरणार

– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई :- आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पराभव होण्याची भीती असल्यानेच ठाकरे बंधू एकत्र येऊन ‘प्रीतिसंगम’ नव्हे तर ‘भीतीसंगम’ नाटक सादर करणार आहेत. हा ‘भीतीसंगम’ प्रयोग मतदार फ्लॉप ठरवणार आहेत, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी उबाठा- मनसे युतीची खिल्ली उडवली. भाजपा प्रदेश कार्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भावाला घरातून हाकलले, त्यांचा मनसे पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला होता आता पराभवाच्या भीतीमुळे याच भावासाठी प्रीतीचे खोटे भरते येत असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी बन म्हणाले की, राज ठाकरे 100 जागांची मागणी करत असताना त्यांच्या मनसे ला 60 जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उबाठा गटाकडून होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्याची होत असलेली विकासाची घोडदौड मतदारांसमोर आहे. म्हणूनच ठाकरे बंधूंच्या या भीतीसंगम नाटकाच्या प्रयोगाचा कितीही गाजावाजा करत घाट घातला तरी ते नाटक रंगमंचावर येण्याआआधीच पडणार हे निश्चित आहे. महायुतीचा प्रयोग हाउसफुल्ल होणार आणि मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा महायुतीचाच झेंडा फडकणार असा विश्वास बन यांनी व्यक्त केला.

या नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपाने पैशांची उधळपट्टी केली या राऊतांच्या टिकेचा खरपूस समाचार घेत बन यांनी राऊतांना याबाबतचे ठोस पुरावे द्या, अन्यथा वायफळ बडबड थांबवा असे आव्हान दिले. भष्टाचार करणारे,घोटाळे करणारे राऊत कुठल्या तोंडाने ही टीका करतात असे खडे बोल ही त्यांनी सुनावले.

पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’ – उद्धव ठाकरे रेहमान डकैत

नगरपालिका, नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना धूळ चारली. नगरपालिकांपाठोपाठ आता महापालिका निवडणुकांमध्ये देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’ ठरणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या विरोधात याचिका दाखल करणा-या लोकांना उबाठा गटामध्ये सामील करून घेतले त्यामुळे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि राऊत हेच रेहमान डकैत असल्याचे ते म्हणाले. नगर पालिका, नगर पंचायत निवडणुकीत धुरंधर कोण यावर मतदारांनीच शिक्कामोर्तब केल्याचेही ते म्हणाले.

रोहित पवारांवर बन यांचा पलटवार

काँग्रेस ही भाजपाची बी टीम असा हास्यास्पद आरोप करणा-या रोहित पवारांवर बन यांनी पलटवार केला. मविआ चा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा तिप्पट जागा मिळाल्या म्हणून असुयेपायी रोहित आरोप करत असल्याचे बन म्हणाले

निलेश राणे आणि महायुतीची एकजूट कायम

निलेश राणे हे महायुतीचेच आहेत. सिंधुदुर्गामध्ये काही ठिकाणी आमची युती होऊ शकली नाही त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळे लढलो. काही मतभेद झाले मात्र आमच्यात मनभेद काहीही नाहीत असे बन यांनी स्पष्ट केले.

निवडणूक जिंकल्यावर मिरवणूक आणि हरल्यावर राऊतांचे रडगाणे

लहान मूल जसे जिंकले की उड्या मारते आणि हरले की रडारड करते तसे राऊतांचे निवडणूक हरल्यानंतर रडगाणे सुरू होते. बालिशपणातूनच राऊतांनी बिहार, तेलंगणाचा मुद्दा समोर आणला आहे अशी प्रखर टीका बन यांनी केली. घरात बसणा-यांना मतदारांनीच घरी बसवले आणि अहोरात्र विकास करणा-यांना खुर्चीत बसवले असेही ते म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.