Ø जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश
Ø संभाव्य पाणीटंचाईचा घेतला आढावा
यवतमाळ :- उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी प्रशासनाने तयार राहून नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.
या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, विविध विभागांचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्रामीण व शहरी भागातील सध्याची पाणीपुरवठा स्थिती, उपलब्ध जलसाठे, विहिरी व बोअरवेलची स्थिती, तसेच संभाव्य टंचाईग्रस्त भागांबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी विकास मीना यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोठेही पाणीटंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी. जिल्ह्यातील धरण प्रकल्पांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. पाणीपुरवठयाबाबत मागणीची नोंद घ्यावी. ज्या भागांमध्ये जलस्रोत कमी होत आहेत किंवा उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आगाऊ नियोजन करून पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. पाणीपुरवठा योजनांची नियमित पाहणी करून कोणतीही अडचण उद्भवल्यास ती तातडीने दूर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
तसेच नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळेल याची खबरदारी घ्यावी. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी ठेवावी, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
नागरिकांनीही पाण्याचा जपून व जबाबदारीने वापर करावा आणि जलसंधारण उपक्रमांना प्राधान्य द्यावे, जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या उद्भवू नये यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.




