– ओळख पटविण्यासाठी तपास सुरू
संदीप कांबळे,कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रमा नगर परिसरातील रेल्वे पटरीवर शुक्रवारी पहाटे अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून, नवीन कामठी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
रमा नगर कामठी येथील रेल्वे पोल क्रमांक १११७/११ ते १११७/१३ दरम्यान पहाटेच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. . माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अक्षय झगडे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.
मृत व्यक्तीच्या अंगावर गुलाबी रंगाचा टी-शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. घटनास्थळालगतच्या रमा नगर वस्तीत पोलिसांनी नागरिकांकडे चौकशी करून मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. या प्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात , कलम १९४ बीएनएसएस अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपरोक्त नमूद वर्णनाचा मृतक व्यक्ती ओळखीचा असल्यास नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.





