spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गडचिरोलीतील पूल उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच बांधला गेला

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी डागली तोफ

मुंबई :- राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काठावर पास झालेले आमदार रोहित पवार यांनी काल गडचिरोलीत एक पूल कोसळल्याबद्दल ट्विट करून आरोप केले आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या पुलाच्या बांधकामाचा करारनामा 2020 मध्ये झाला, तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. रोहित पवार, तुम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होतात. 2022 मध्ये पुलाचे पूर्ण बांधकाम करण्यात आले. या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, रोहित पवार सरकारचे घटक होते, आमदार होते. रोहित पवार यांनी दलालांचे, कंत्राटदारांचे सरकार म्हणून टीका केली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात गडचिरोलीचा पूल बांधण्यात आल्याने या पुलाच्या बांधकामात उद्धव ठाकरे यांनी किती टक्केवारी घेतली याचे उत्तर द्यायला पाहिजे, अशा शब्दात भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी तोफ डागली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यात कोण श्रेष्ठ, हा प्रश्नच नाही. मूळ शिवसेना ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची होती. उद्धव ठाकरे यांनी केवळ विधिमंडळ पक्षावर बोलण्याऐवजी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो’ हे म्हणायचे का सोडून दिले यावर आधी बोलावे. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. तशी वेळ आली तर माझे दुकान बंद करेन, हे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. मूळ शिवसेनेची अशी वैचारिक पडझड झाल्याने शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढे मार्गक्रमण करत आहे. न्यायालयात काय निकाल लागायचा तो लागेल, पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी असल्याचे महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट केले आहे, अशा शब्दात संजय राऊत यांचा समाचार घेतला.

संजय राऊतांसारखे वायफळ बडबड करण्यापेक्षा गप्प बसलेले कधीही चांगले, या शब्दात अमृता फडणवीस यांनी अतिशय व्यवस्थित घेतलेला समाचार योग्य असल्याचे सांगून बन म्हणाले, संजय राऊत, तुमच्या वायफळ बडबडीला लोक कंटाळलेले आहेत. तुम्ही उबाठा गट संपवण्यासाठी राहुल गांधींकडून किती कमिशनखोरी केली, हे एकदा महाराष्ट्राला सांगा. तुम्ही ज्या पद्धतीने शिवीगाळ करता, अश्लील भाषेत लोकांवर टीका करता, हे महाराष्ट्र पाहत आहे. तुमच्यामुळे लोकशाही वाचली असती तर तुमच्या पक्षाची ही वेळ आली नसती. लोकशाहीमध्ये जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे.

उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करण्याची संजय राऊतांची इच्छा 

एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वासाठी लढणारी शिवसेना असल्याने ती अन्य पक्षात विलीन होण्याचा प्रश्न येत नाही, असे निक्षून सांगत बन पुढे म्हणाले, आता उरलासुरला उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करायचा का समाजवादी पार्टीत, याचीच चर्चा मातोश्रीवर सुरू आहे. राहुल गांधींची इच्छा आहे की संजय राऊत यांच्यासह उबाठा गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आपला पक्ष समाजवादी पार्टीत विलीन करण्याची इच्छा आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे समाजवादी पार्टीत उबाठा गट विलीन करतात की, संजय राऊत यांच्या सांगण्यावरून काँग्रेसमध्ये, याची वाट महाराष्ट्र पाहतोय.

Popular Articles