– सरपंच यांच्या सतर्कतेमुळे शेती विक्रीची फसवेगिरी उघडीस
– तालुक्यात बनावट कागदपत्राद्वारे शेती विक्री करणारे रॅकेट सक्रिय
– केवळ २५ लाखांत ४ एकर शेती दराने बळावला संशय
– दोन आरोपींना १३ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
सचिन चौरसिया प्रतिनिधी,रामटेक :- बनावट कागदपत्राद्वारे शेती विक्रीचा डाव सरपंचाच्या सतर्कतेने फसल्यामुळे तालुक्यात बनावट कागदपत्राद्वारे शेती विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, न्यायालयाने सोमवार, १३ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
शेतमालक संजय शंकर अंबादे, ५० रा. इंदोरा चौक, नागपूर यांची मांद्री (ता. रामटेक) ग्रामपंचायत अंतर्गत मानेगाव (रिठी) येथे पटवारी हल्का नं. ३४ अ. मौजा मानेगाव (रिठी) सर्वे नं. १८१/१ येथे ४ एकर शेती आहे. शेतीमालक संजय अंबादे हे शेती बटईने देतात. दरम्यान रामटेकचे सामाजिक कार्यकर्ते धर्मेश भागलकर यांना आरोपी मनोज राजेराम पडोळे (वय ४८ वर्षे रा. वॉर्ड क्रं. ३ नांदगाव, ता. मौदा) व राकेश खुशाल शेडे (वय २१ वर्ष रा. वॉर्ड क्रं. ४. मौदा) भेटले. दोघांनीही धर्मेश भागलकर यांना मानेगाव (रिठी) येथील आमची ४ एकर शेती २५ लक्ष रुपयांत विकायची आहे. शेती पाहुन घ्या. त्वरीत टोकन देऊन टाका, असा आग्रह त्यांनी धरला. त्या भागात २० ते २५ लक्ष रुपये एकर शेतीचा दर असतांना एवढ्या कमी किंमतीत शेती का विकत आहे, ही शंका भागलकर यांना आली. भागलकर यांनी मित्र मांद्रीचे सरपंच आशिष उर्फ बाल्या मासुरकर यांना फोनद्वारे माहिती दिली. शहानिशा करण्यास सांगितले. सरपंच मासूरकर यांनी लगेच शेतमालक संजय अंबादे यांच्याकडे फोन करून विचारणा केली आणि प्रकरणाचे बिंग फुटले. सरपंच मासुरकर यांनी रामटेक पोलिसांना फोन करून माहिती दिली व दोन्ही आरोपींनात्यांच्या सुपूर्द केले. रामटेक पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून न्यायालयात उभे केले. न्यायालयाने आरोपींना सोमवार १३ ऑक्टोंबरपर्यंत पोलिस कोठीडी सुनावली. तपास ठाणेदार अरविंद कतलाम यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
असे फुटले आरोपींचे बिंग !
सरपंच आशिष उर्फ बाल्या मासूरकर यांनी शेतमालक संजय अंबादे यांना फोनकरून शेती विक्रीबाबत विचारणा केली. अंबादे यांनी असा कोणताही विचार नसल्याचे मासूरकर यांना सांगितले. यावरून हा प्रकार प्रकार फसवणुकीचा असल्याचे सरपंच मासुरकर यांच्या लक्षात आले. मासूकर यांनी खरेदीदार भागलकर यांना फोन करून आरोपींना शेती पाहण्याच्या बहाण्याने घेऊन येण्यास सांगितले. भागलकर हे आरोपींसह शेतीजवळ आले. सरपंच मासूरकर काही गावकऱ्यांना घेऊन तेथे पोहोचले. आधार कार्ड दाखवण्यास सांगितले. एकाआरोपींने आधार कार्ड दाखवले. त्यावर खराशेतीमालक संजय अंबादे यांचे विवरण होते. मात्र फोटो आरोपीचा होता. आधार कार्ड बनावट असल्याचे लक्षात येताच सरपंच मासुरकर यांनी दोन्ही आरोपींना पकडले. ग्रामपंचायत कार्यालयात खरा शेतीमालक व पोलिस पोहचेपर्यंत पकडून ठेवले.



