spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्ह्यातील पहिले महिला रुग्णालय अहेरीत!‘ती’ च्या आरोग्याची काळजी

नागपूर :- महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा म्हणजे मागास, दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशीच इतरांना असलेली ओळख, पण मुख्यमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची ही ओळख पुसून टाकण्याचा नुसता संकल्पच केला नाही, तर तसे निर्णय घेतले. त्यामुळेच आज हा मागास समजला जाणारा जिल्हा आता विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागला आहे. याच मालिकेतील एक प्रकल्प म्हणजे जिल्ह्यातील अहेरी या तालुक्याच्या ठिकाणी उभारलेले महिला व बाल रुग्णालय.कमालीची अंधश्रद्धा आणि त्यामुळे आजारांसाठी तंत्र मंत्रावरच विसंबून राहणाऱ्या या परिसरातील महिला व बालकांना उत्तमोत्तम आरोग्य सुविधा यामुळे मिळू लागल्या आहेत. त्यामुळेच माता मृत्यू आणि बाल मृत्यूसाठी बदनाम असलेला हा जिल्हा दर्जेदार आरोग्य सुविधांचे केंद्र ठरू लागला आहे.

अहेरी येथे उप जिल्हा रुग्णालय आहे मात्र या रुग्णालयाच्या काही मर्यादा असल्याने खास महिलांसाठी रुग्णालयाची गरज होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेमके हे हेरले आणि अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे हे रुग्णालय उभे झाले. येथील उप जिल्हा रुग्णालयातही उपचार होत होते, मात्र त्या 50 खाटांच्या रुग्णालयात रुग्ण वाढले की कधी त्यांना जमिनीवर झोपवून उपचार करावे लागायचे. आता झालेले हे महिला रुग्णालय तब्बल 100 खाटांचे आहे. याशिवाय येथे नवजात विशेष कक्ष (एस एन सी यु) सुरू करण्यात आला आहे. या कक्षाची क्षमता 24 आहे. विशेष म्हणजे आत असलेल्या बाळाला त्याची आई बाहेरूनच पाहू शकणार आहे. कारण या कक्षात मातांना जाण्याची परवानगी नसते. त्यामुळे आत असलेले बाळ कसे आहे, हे बाहेरच्या स्क्रीनवर पाहता येईल. त्यासाठी कक्षात कॅमेरा बसविण्यात आला असून, ज्या मातेला आपले बाळ पाहायचे असेल त्याच्यावर कॅमेरा स्थिर करून आई बाळाला पाहू शकेल.

त्याच प्रमाणे आत सुरू असलेली शस्त्रक्रिया देखील नातेवाईकांना बाहेर लावलेल्या पडद्यावर दिसणार आहे. अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मुलचेरा या पाच तालुक्यांसह परिसरातील महिलांसाठी हे रुग्णालय वरदान ठरले आहे.

मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह, तीन लेबर रुम, सोनोग्राफी, एक्स रे, रक्त साठवणूक केंद्र अशा आवश्यक सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे रुग्ण आणि एक आप्त यांना दोन्ही वेळचे जेवण, नाश्ता, चहा देखील निःशुल्क देण्यात येत आहे.

माता आणि बाल मृत्यू रोखण्यासाठी हे रुग्णालय वरदान ठरू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागास समजल्या जाणाऱ्या परिसरासाठी खूप मोलाचे कार्य केल्याची भावना येथील लोकांमध्ये आहे.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा वैशिष्ट्यपूर्ण रुग्णालयाची अत्यंत गरज होती. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ती गरज आज पूर्ण झाली आहे. परिसरात आरोग्य विषयक जनजागृतीसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी मनापासून प्रयत्न करीत आहेत. परिसरातील महिलांनी या रुग्णालयाचा लाभ घेण्याचे आवाहन नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. शशिकांत शंभरकर यांनी केले आहे.

Popular Articles