spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

शहर स्वच्छतेचा संकल्प करणारा ‘डॉक्टर’

– प्रत्येकजण -प्रत्येक रविवार- 100 मीटर’

– रस्त्यावरील कचरा उचलण्याचा डॉ. कुमार निर्भय यांचा अनोखा व स्तुत्य उपक्रम

नागपूर :- रविवारी सकाळी जेव्हा लोक आळस झटकत घरात असतात, त्यावेळी सिव्हील लाईन्स परिसरातील रस्त्यावरील केरकचरा उचलण्यात एक व्यक्ती मग्न झालेली असते. प्रत्येक रविवारी ही व्यक्ती रस्त्याच्या बाजूला साचलेला कचरा एका पिशवीत जमा करून कचरा कुंडीत जमा करण्याची मुशाफिरी करीत असतात. त्यांची ही छोटसी कृती मात्र, अनेकांसाठी अनुकरणीय व नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी खारीचा वाटा उचलणारी आहे.

मध्य रेल्वेमध्ये पेशाने डॉक्टर असलेले डॉ. कुमार निर्भय नागपूर शहराचेही आरोग्य चांगले राहावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांचा हा आठवडी शिरस्ता झाला आहे. ते दर रविवारी सकाळी उठून सिव्हील लाईन्स भागातील बोले पेट्रोल पंपपासून तिरपुडे महाविद्यालय पर्यंतच्या रस्तावरील कचरा उचलण्याचे काम व्रत घेतल्याप्रमाणे करतात. प्रत्येकजण, 100 मीटर – दर रविवारी हा त्यांचा शहर स्वच्छ ठेवण्यासाठी असलेला अनोखा संकल्प आहे. हे काम करताना त्यांच्यासोबत सहकारी नसतात, कुठेही फोटो छापून आणण्याची इच्छा नसते व व्हीडीओ काढून सोशल मिडीयावर पोस्ट करण्याची इर्षाही नसते. ते केवळ नागपूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी एक नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारी पार पाडीत असतात.

रस्त्याच्या कडेला पडलेल्या प्लास्टिकच्या व काचेच्या बॉटल्स, प्लास्टिकच्या पिशव्या, फुटलेल्या काच या बहुतेकजण त्याकडे दुर्लक्ष करून समोर जातात. परंतु, डॉ. कुमार निर्भय यांनी मात्र दर रविवारी हा कचरा वेचून कचरा कुंडीत टाकण्याचा व्रत स्वीकारला आहे. दर रविवारी ते हातात ग्लोव्हज, कचरा उचलणारी काठी व एक प्लास्टिकची बॅग घेऊन घराबाहेर पडतात व शांतपणे रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम सुरू करतात. डॉ. कुमार निर्भय यांची ही कृती पाहून काही महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा या अभियानाशी जुळले. या विद्यार्थ्यांना आपल्या घराजवळील रस्ते स्वच्छ करण्याचे आवाहन त्यांनी केले. आता हे विद्यार्थी सुद्धा आपल्या घराजवळील रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम करीत स्वच्छ नागपूरसाठी सहकार्य करीत आहेत. डॉ. निर्भय यांची ही छोटीसी कृती आता इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

स्वच्छता ही जबाबदारी प्रत्येकाची – डॉ. कुमार निर्भय

नागपूर शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ नागपूर महानगरपालिकेची जबाबदारी नाही. शहरामध्ये नागरिक येनकेन प्रकाराने कचरा निर्माण करतात. या कचर्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी नागरिकांची देखील आहे. ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने प्रत्येक रविवारी आपल्या परिसरातील 100 मीटर रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम केल्यास नागपूर एक स्वच्छ शहर होण्यास मदत होणार तसेच नागरिकांचे आरोग्यही स्वस्थ राहण्यास मदत होणार, असे त्यांनी सांगितले.

अनुकरणीय व स्तुत्य उपक्रम – डॉ. अभिजीत चौधरी

आपले नागपूर शहर स्वच्छ ठेवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. या सामाजिक बांधिलकीतून डॉ. कुमार निर्भय यांनी दर रविवारी कचरा उचलण्याचा उपक्रम राबवून शहर स्वच्छ करण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी मदत करीत आहेत, असे गौरवोद्गार नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी काढले. हा त्यांचा उपक्रम इतरांना सुद्धा अनुकरणीय राहणार आहे. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलल्यास आपले शहर स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. प्रत्येकाने दर रविवारी, 100 मीटर प्रत्येकजण या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.