– भंडाऱ्यात ओबीसींचे बेमुदत साखळी उपोषण २१व्या दिवशीही सुरू; खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा आंदोलनाला पाठिंबा
हंसराज, भंडारा :- “ओबीसी समाज आपल्या हक्काची जनगणना मागत आहे. हा लढा केवळ भंडाऱ्याचा राहिला नसून, संपूर्ण देश आता ओबीसी जनगणनेसाठी पेटून उठला आहे. जोपर्यंत जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन थांबणार नाही,” असा आक्रमक पवित्रा ओबीसी नेते उमेश मोहतुरे यांनी घेतला आहे. भंडाऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या ओबीसींच्या बेमुदत साखळी उपोषणाच्या २० व्या दिवशी ते बोलत होते.
ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व्हावी आणि आगामी राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे.
आंदोलकांचा आक्रमक पवित्रा आणि वाढत असलेली गर्दी यामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचा दिल्लीतून थेट पाठिंबा भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन समाज बांधवांशी संवाद साधला. “ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास खपवून घेतले जाणार नाही. संसदेतही मी ओबीसींच्या न्यायासाठी आवाज उठवला आहे आणि यापुढेही तो अधिक तीव्र करेन,” असे आश्वासन खासदारांनी यावेळी दिले.
सरकार आमचा अंत पाहू नका – उमेश मोहतुरे
आंदोलनात सहभागी उमेश मोहतुरे यांनी सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. ते म्हणाले, “सरकार ओबीसी समाजाला घाबरत आहे. जर हक्क द्यायचे नसतील, तर सरकारने तसे स्पष्ट जाहीर करावे. प्रत्येक गावात ग्रामपंचायतीकडे जन्मापासून मृत्यू पर्यंतच्या नोंदी आहेत. तिथे जातीनिहाय कुटुंबांची माहिती उपलब्ध आहे, ती माहिती सरकारने संकलित करावी आणि जनगणना जाहीर करावी. अनेक वर्षांपासून आश्वासनांची गाजरे दाखवली जात आहेत, पण आता ओबीसींचा संयम सुटला आहे.”
८० वर्षीय सदानंद इलमे यांचा जिद्दीने सहभाग या आंदोलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ८० वर्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद इलमे. एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा उत्साहात आणि जिद्दीने ते या वयातही ओबीसींच्या हक्कासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत बाळकृष्ण सार्वे, भगीरत धोटे, रोशन उरकुडे, प्रभाकर वैरागडे, गयानचंद जांभूळकर, गोपाल सेलोकर, किसन शेंडे, पांडुरंग खाटिक, सुभद्रा झंझाळ, गुणवंत पंचबुदे यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित आहेत.
आंदोलनात हजारो ओबीसी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अनेक ग्रामपंचायतींनी या आंदोलनाला पाठिंबा देत जनगणनेवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. “आमचा हक्क आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सरकारने दखल न घेतल्यास संपूर्ण भंडारा जिल्हा बंद करण्यात येईल आणि आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
प्रमुख मागण्या:
🔹 ओबीसी समाजाची तात्काळ अचूक जातनिहाय जनगणना करावी.
🔹आगामी जनगणनेच्या अर्जात ओबीसी (OBC) प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना देण्यात यावा.
🔹 लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना घटनात्मक हक्क आणि सवलती मिळाव्यात.



