बाबांचे काम असंख्य कष्टकऱ्यांच्या धमन्यांतून वाहते आहे. कष्टकऱ्यांचा हा आधारवड केवळ आंदोलक नव्हता, तर सामाजिक कृतिशीलतेचा ऐतिहासिक आविष्कार होता.
हक्कांसाठी आंदोलने करणाऱ्यांना ‘आंदोलनजीवी’ म्हणून हिणवले जाण्याच्या आजच्या काळात विविध प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणाऱ्या डॉ. बाबा आढाव यांचे असणे किती महत्त्वाचे होते, हे ते गेल्यानंतर विशेषत्वाने जाणवते. सामाजिक जीवनातील मूळ प्रश्न बाजूला सारून आजूबाजूला धर्म, जात, वंश यांचे निमित्त करून हिंसक-हिणकस वृत्ती फोफावत असताना शोषित, वंचित, पीडितांच्या हक्कांसाठी ‘झिंदाबाद’ची आरोळी ठोकणारे बाबा आता नाहीत, ही मोठी पोकळी आहे. लोकशाही समाजवादावर निष्ठा आणि महात्मा फुले यांचा सत्यशोधकी वारसा उक्ती-कृतीत असणारे बाबा अखेरपर्यंत संघर्षरत होते. त्यांच्या लढाईला नैतिक अधिष्ठान असल्याने अहिंसक आंदोलनांतही ते निर्भीड होते. कष्टकऱ्यांचा हा आधारवड केवळ आंदोलक नव्हता, तर सामाजिक कृतिशीलतेचा ऐतिहासिक आविष्कार होता. तो कोसळणे ही मोठी सामाजिक हानी आहे.
बाबा आढाव यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व केवळ एक व्यक्ती नसते, तर ते एक सामाजिक घटित असते. असा ‘फिनॉमिना’ किती आयुष्यांना स्पर्श करून जातो, याची गणनाच होऊ शकत नाही. म्हणूनच बाबांनी प्रत्यक्ष उभे केलेले काम, केवळ यादीत मावणारे नाही. ते असंख्य कष्टकऱ्यांच्या धमन्यांतून वाहते आहे. स्वत:चे मोठेपण बाजूला ठेवून समाजाला मोठे करणारे बाबांसारखे नेते विरळाच. अखेरच्या दिवसांत बाबा आजारी आहेत, असे कळल्यावर त्यांच्याशी जोडलेले कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन पुण्यातील रुग्णालयाबाहेर पापण्यांच्या ओलावलेल्या कडा पुसत थांबत होते, कारण त्यांचे ते अनेकार्थांनी ‘बाबा’ होते. लढवय्या कार्यकर्त्यातील माणूसपण असे पुढे पाझरत राहते…
बाबासाहेब पांडुरंग आढाव अर्थात बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० चा. ते मूळचे पुण्याचे. वडील लहानपणीच वारल्याने बाबा आणि त्यांच्या भावंडांचे संगोपन त्यांच्या आईने आजोळीच केले. बाबांचे प्राथमिक शिक्षण महापालिकेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झाले. बाबांचे आजोबा सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतील आघाडीचे नेते. नाना पेठेतील त्या घरात विठ्ठल- भक्ती होती, पण त्याचबरोबर विद्रोही तुकारामांच्या समतेचे आणि संघर्षाचे बीजही होते. हायस्कूलमध्ये असतानाच बाबांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. १९४३ ते १९५० या काळात ते नियमितपणे राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात. त्याच वेळी एस. एम. जोशी, भाऊसाहेब रानडे, ना. ग. गोरे, राममनोहर लोहिया या समाजवादी नेत्यांच्या सहवासातून त्यांच्या विचारांना ठोस सामाजिक-राजकीय चौकट मिळाली. पुढे भाई वैद्या, पन्नालाल सुराणा, बापूसाहेब काळदाते आदी सहकाऱ्यांच्या सोबतीने त्यांनी ही समाजवादी आणि सत्यशोधक विचारांची वाटचाल केली.
रसायनशास्त्राची पदवी आणि आयुर्वेद वैद्याकशास्त्रात पदविका प्राप्त केल्यानंतर बाबांनी १९५२ मध्ये नाना पेठेत दवाखाना सुरू केला. त्यांच्या दवाखान्याच्या आसपास असलेल्या व्यापारी पेठांमुळे त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये हमालांची संख्या खूप मोठी होती. त्यांच्याशी बोलताना त्यांच्या शोषणाची आणि अन्यायाची जाणीव झाल्यानंतर बाबांनी फक्त रुग्णांचा नाही, तर कष्टकरी समाजाचा डॉक्टर व्हायचे ठरवले. सन १९५५ मध्ये स्थापन झालेली हमाल पंचायत ही त्याची पहिली पायरी. हमालांसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदा करावा म्हणून बाबांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलने उभी राहिली. या आंदोलनांना यश येऊन १९६९ मध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायदा अस्तित्वात आणला. कोणतेच हक्क आणि कामाची सुरक्षितता नसलेल्या हमालांना संघटित करून कायद्याद्वारे किमान सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम बाबांनी केले.
वैद्याकीय व्यवसाय सोडून पूर्ण वेळ सामाजिक कामात उतरल्यानंतर बाबांनी अनेक आंदोलने केली. संयुक्त महाराष्ट्रासाठीचे आंदोलन, गोवा मुक्ती संग्राम, महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसनासाठी पुढाकार, कष्टकऱ्यांना चांगले अन्न मिळावे म्हणून अल्प दरात भोजन सुविधा देणारा ‘कष्टाची भाकर’ हा उपक्रम, ‘पुरोगामी सत्यशोधक’चे संपादन, देवदासी प्रथा निर्मूलन व पुनर्वसन चळवळ, १९७२ मध्ये दलितांना गावातील पाणवठ्यावर समान हक्काची मागणी करणारी ‘एक गाव, एक पाणवठा’सारखी ऐतिहासिक चळवळ, आणीबाणीत झोपडवासीयांचा मेळावा घेतला, म्हणून १४ महिने तुरुंगवास, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठीचा लाँग मार्च, महात्मा फुले समता प्रतिष्ठान व राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना आर्थिक साहाय्य मिळवून देण्यासाठी सामाजिक कृतज्ञता निधी, भिवंडी दंगलग्रस्त, ओडिशा वादळग्रस्त, मराठवाडा भूकंपग्रस्त यांच्यासाठी मदतनिधी अशी अनेकानेक कामे बाबांच्या नेतृत्वाखाली झाली. कामांची ही नुसती यादी वाचतानाही स्तिमित व्हायला होते; बाबा तर हे प्रत्यक्ष जगले.
या सगळ्या कामांच्या दरम्यान ते राजकारणातही सहभागी झाले. नाना पेठ मतदारसंघातून नागरी संघटनेकडून ते सलग दोन वेळा पुणे महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून गेले. लोकसभा निवडणूकही लढवली. पण, हा आपला प्रांत नाही, हे लक्षात येताच ते त्यातून बाजूलाही झाले. अलीकडच्या काळात, ‘सरकारी अलंकार म्हणजे एक प्रकारची बेडीच,’ असे सांगत त्यांनी राज्याचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च सन्मानही नाकारला. बाबांच्या या वादळी प्रवासात सतत पडद्यामागे, पण महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला, तो त्यांची पत्नी शीलाताई आढाव यांचा. त्यांनी परिचारिका म्हणून नोकरी करतानाच असीम आणि अंबर या दोन्ही मुलांची जडणघडण केली. शिवाय, ज्या ज्या वेळी संघर्ष तीव्र झाला, त्या त्या वेळी त्यांना उभे राहण्याचे बळही दिले.
भारताने १९९० च्या दशकात जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर झालेले अनेक आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक बदल समाज ढवळून काढणारे होते. अशा वेळी समाजवादाची ज्योत तेवत ठेवण्याचे आणि बाजारपेठीय रेट्यात कष्टकऱ्यांचे हक्क हिरावले जाऊ नयेत म्हणून लढा देण्याचे काम अग्रभागी राहून कुणी केले असेल, तर ते बाबा आढाव यांनी. रिक्षाचालकांवरील अन्यायाला वाचा फोडून त्यांच्या हक्कांसाठी संघर्ष उभा करणारी रिक्षा पंचायत ९०च्या दशकातच स्थापन झाली. गेल्या अडीच-तीन दशकांत बाबांनी पथारी व्यावसायिकांच्या समस्या, माथाडी कायद्यातील बदल अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर भूमिका घेऊन आंदोलने केली. पुण्यातील कागद-काच-पत्रा संघटना, पथारी व्यावसायिक, मोलकरीण आदींच्या हक्कांसाठीचे संघर्षही अलीकडचेच. सरकारची चुकीची धोरणे, खोटी कथने, निवडणुकीतील घोटाळे, अनैतिक पक्षांतरे यांविरोधातही हा लढवय्या अगदी गेल्या महिन्यापर्यंत रस्त्यावरील आंदोलनांत सहभागी होऊन कार्यकर्त्यांना स्फूर्ती देत होता…
बाबा प्रखर पुरोगामी, बुद्धिवादी आणि विवेकवादी. ते म्हणत, ‘प्रगत देशांशी त्यांचा अनुनय करून वा नकला करून स्पर्धा होऊ शकणार नाही, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि विज्ञानाची कास धरून अस्सल काही तरी निर्माण करून स्पर्धा करावी लागेल.’ चळवळी अस्तंगत होत असताना विज्ञानाची कास धरून पुढे येणारी तरुणाई ही बाबांना आशेचा किरण वाटत होती. तरुणांना संघर्षासाठी पुढे यावे लागेल, अहिंसा, सविनय कायदेभंगाची ताकद ओळखावी लागेल, असे म्हणणाऱ्या बाबांची प्रत्येक गावात संविधान घर व्हावे, अशी इच्छा होती.
बाबा प्रत्येक आंदोलनात ‘आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही’ ही कविता आणि महात्मा फुले यांचा ‘सत्य सर्वांचे आदि घर’ हा अखंड सगळ्यांबरोबर म्हणत. कष्टकऱ्यांमध्ये हृदयस्थ झालेले बाबा धगधगत्या संघर्षात सामीलकीची भावनाही पेरत. भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आपल्या पिशवीतून चाफ्याचे फूल काढून देत. त्यांनी सुगंधित केलेली अशी अनेक माणसे, कार्यकर्ते कोणत्याही अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने लढा द्यायला पुढे येत राहतील, तेव्हा तेव्हा बाबांची सावली साथ करेल. फूल दिले, की माणूस उमलायला सुरुवात होतेच…




