पांढरकवडा :- गेल्या काही दिवसांपासून पांढरकवडा पोलीस ठाण्यातील कारभार चांगलाच चर्चेत आला आहे. बदली होऊनही एका वादग्रस्त कर्मचाऱ्याला ठाण्यातच डांबून ठेवल्याचा मुद्दा तापलेला असतानाच, आता या प्रकरणाला एक अत्यंत संतप्त आणि खोचक असे नवे वळण मिळाले आहे. “ज्यांची खरंच काम करण्याची जिद्द आहे, अशा प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त केले गेले; मग या ‘चमकूगिरी करणाऱ्या बोलक्या पोपटाला’ नेमके कोणत्या कारणासाठी अद्याप पांढरकवडा ठाण्यातच पोसले जात आहे?” असा उद्विग्न सवाल आता नागरिकांमधून विचारला जात आहे.
बदलीचे नियम केवळ प्रामाणिक कर्मचाऱ्यांसाठीच का?
कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची तत्काळ सुटका: सूत्रांच्या माहितीनुसार, पांढरकवडा पोलीस ठाण्यातून तीन महिने आधी झालेल्या बदल्यांमध्ये जे कर्मचारी खरोखरच गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आणि कामात अग्रेसर होते, त्यांना तातडीने कार्यमुक्त करून नवीन ठिकाणी पाठवून देण्यात आले.
याउलट, सतत कोणत्या न कोणत्या वादानुसार चर्चेत असणाऱ्या आणि केवळ वरिष्ठांपुढे चमकूगिरी करणाऱ्या या तथाकथित ‘पोपटाची’ बदली होऊनही तो अजूनही त्याच खुर्चीवर आणि त्याच ठाण्यात दिमाखात वावरत आहे. प्रशासकीय नियम फक्त कष्टाळू कर्मचाऱ्यांवरच लागू होतात का, असा संतप्त सवाल यावरून निर्माण झाला आहे.
“पानाच्या विड्यावर रंगलेली गुफ्तगू आणि कानाचे समाधान”
स्थानिक वर्तुळात आता या कर्मचाऱ्याबाबत अत्यंत उपरोधिक चर्चा रंगू लागल्या आहेत.
“पान खाऊन रंगलेले लाल लाल तोंड, ‘मिठी छुरी बगल में, सारी दुनिया मेरी दिवानी’ असा आव आणणारा हा बोलका पोपट बोलण्यात अतिशय गोड आणि पटाईत असला, तरी प्रत्यक्षात गुन्हे शोधण्यात किंवा सामान्य जनतेच्या कोणत्याही फायद्याच्या कामात तो कधीच उपयोगी पडत नाही. गुन्हे नोंदवणे किंवा तपासाचा साधा कागद तयार करणे याच्याकडून होत नाही, मग केवळ कानाचे गोडवे ऐकण्यासाठी आणि स्वतःच्या करमणुकीसाठी वरिष्ठ या ‘चमकूगिरी करणाऱ्या पोपटाला’ पाठीशी घालत आहेत का?”* असा बोचरा सवाल नागरिक विचारत आहे
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे डोळे:
टॉवरवरील हायव्होल्टेज ड्रामा असो किंवा इतर वादग्रस्त प्रकरणे, या कर्मचाऱ्यामुळे सतत पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत आहे. वृत्तपत्रांमध्ये वारंवार बातम्या येऊनही वरिष्ठ पातळीवरून मूकसंमती मिळणे हे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरत आहे.
आता जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात नेमकी काय ठोस भूमिका घेतात आणि या ‘विशेष मेहरबान’ कर्मचाऱ्याला आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या यंत्रणेला चाप लावला जातो का, याकडे संपूर्ण पांढरकवडा तालुक्याचे लक्ष लागून आहे.





