स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी – पोलीस स्टेशन कुही हद्दीतील घटना
कुही ९ – दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी मौजा कुसुंबी येथे देवराव शामराव भरजाळे (वय ५६, रा. शिवांगी नगर, नागपूर) यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली. भरजाळे हे आपल्या दुचाकीने (क्र. MH 49 W 4889) एकटेच निघाले असता उमरगाव–पांढरकवडा रोडवरील टर्निंग जवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यावर व शरीरावर वार करून ठार मारले. या प्रकरणी पोलीस स्टेशन कुही येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला. कौशल्यपूर्ण तपास, गुप्त माहिती व तांत्रिक पुरावे यांच्या आधारे अवघ्या ४ तासांतच गुन्ह्यातील आरोपींचा उलगडा करण्यात आला.
तपासात उघड झाले की, मृतकाचा नातेवाईक अंकित संजय येळणे (वय २६, रा. पिपळा, हुडकेश्वर) याचा प्रॉपर्टीच्या वादातून मृतकाशी वाद सुरू होता. त्याने आपल्या मित्र मुक्तेश्वर ज्ञानेश्वर मेश्राम (वय ३८, रा. दुबेनगर, पिपळा, हुडकेश्वर) याला खुनाची सुपारी दिली. दिनांक ७ सप्टेंबर रोजी मृतक कुसुंबी येथे जाणार असल्याची माहिती अंकितला होती. त्यानुसार त्याने मुक्तेश्वर आणि गणेश गंगाराम हुड (वय ३८, रा. दुधाळा, तह. मौदा) यांना घटनास्थळी पोहोचवले. यावेळी गजानन नामदेवराव कडू (वय ३८, रा. पिपळा, हुडकेश्वर) याने मृतक घराबाहेर पडल्याची माहिती आरोपींना दिली. त्यानंतर सकाळी ९ ते १० वाजता मुक्तेश्वर आणि गणेश यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला.
सदर चारही आरोपींना – अंकित येळणे, मुक्तेश्वर मेश्राम, गजानन कडू व गणेश हुड – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांना कुही पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून पुढील तपास कुही पोलीस करीत आहेत.




