spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो – योगगुरू रामदेव बाबा

मुंबई :- वेदवाणी आणि गुरुवाणी मानवतेला मार्गदर्शन करणाऱ्या असून आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात शांततेचा मार्ग गुरुंच्या शिकवणीतूनच मिळू शकतो, असा विश्वास योग गुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केला.

खारघर येथे आयोजित हिंद दि चादर कार्यक्रमात योगगुरू रामदेव यांनी गुरु परंपरेच्या त्याग, शौर्य आणि अध्यात्मिक वारशाचे स्मरण करून राष्ट्रएकतेचा संदेश दिला. गुरुंनी समाजासमोर महान आदर्श ठेवला असून आपण त्या परंपरेचे वारसदार आहोत, असे सांगत त्यांनी गुरुंच्या मार्गावर श्रद्धा आणि कृतज्ञतेने चालण्याचे आवाहन केले.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात बाबा रामदेव बोलत होते. यावेळी जत्थेदार ग्यानी बलदेव सिंग, बाबू सिंग महाराज, शरदचंद्र ढोले, बाबा रामसिंग महाराज, बाबा हरिनाम सिंग, ज्ञानी गुरुदयाल, रघुवीर बाबा, ग्यानी हरमिंदर, प्रधान गुरुविंदर सिंग, हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहीदी समागम राज्यस्तरीय समन्वय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, परभणीचे आमदार राहुल पाटील आदिसह विविध संत ग्यानी उपस्थित होते.

या सोहळ्यात सिख समाजासह बंजारा, लबाना, वारकरी, सिंधी, वाल्मीकि आणि उदासीन परंपरेतील संत-महंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हा केवळ मेळावा नसून गुरु परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि समाज एकतेचा संकल्प दृढ करण्याचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व असून धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी गुरुंनी दिलेले बलिदान अतुलनीय असून त्यागामुळेच सनातन परंपरा आजही टिकून आहे. गुरु नानक देवांपासून गुरु गोविंद सिंह महाराजांपर्यंतची परंपरा हि शौर्य, त्याग आणि अध्यात्माची असल्याचे बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले.

रामेश्वर नाईक म्हणाले यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन आणि गुरु नानक नाम संगत यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहादत वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे विदर्भ व छत्तीसगडच्या संगतीच्या उपस्थितीत शहीदी समारंभ झाला. त्यानंतर २४ व २५ जानेवारीला नांदेड मधील तख्त श्री हजूर साहिब येथे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणातील भाविकांच्या सहभागातून कार्यक्रम पार पडला. २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी कोकण विभागासह राज्यभरातून आणि देश-विदेशातून आलेल्या संगतीने या ऐतिहासिक सोहळ्यात सहभाग घेत आहेत . विविध समाजघटक, उदासीन संप्रदाय आणि वारकरी परंपरेतील भक्तांनी एकत्र येत धार्मिक एकतेचा संदेश दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शीख गुरु तेग बहादुर यांच्या बलिदानाची गाथा सांगताना त्यांच्या शौर्याचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च त्यागाचा उल्लेख करून काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेली शहादत ही मानवतेच्या इतिहासातील अद्वितीय घटना असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने शैक्षणिक संस्था, ग्रामसभा आणि विविध उपक्रमांतून गुरुंचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे नाईक यांनी यावेळी सांगितले.

रामराव महाराज यांनी महाराष्ट्र सरकार गुरु गोविंद सिंह महाराजांचा इतिहास घराघरांत पोहोचवत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी भगवान संत सेवालाल महाराज यांच्या कार्याचाही गौरव त्यांनी केला. संत सेवालाल महाराजांनी देशभर भ्रमंती करून समाजजागृती केली, व्यापार आणि संघटनाच्या माध्यमातून बंजारा समाजाला बळ दिले, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित संताचा, गुरूंचा सन्मान करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.