बांगलादेशातील हिंदूची हत्या झाली म्हणून संतापाने फुरफुरणारे नैतिकतावादी आपल्याच देशात कोणा भारतीयास परकीय समजून मारले जात असेल तर गप्प कसे ?
भेद हा एकदा का राजकीय कार्यक्रमपत्रिकेवर आला की कोणकोणत्या मुद्द्यांवर तो केला जाईल त्यास मर्यादा नाही. हे आईन्स्टाईन यांनी म्हणून ठेवले आहे त्या वेडपटपणासारखे झाले- म्हणजे कोण किती शहाणपणाने वागू शकेल, बुद्धीची चमक दाखवू शकेल यास मर्यादा आहेत. पण कोण किती मूर्खासारखे, बेजबाबदारपणाचे वर्तन करू शकेल यास मर्यादा नसते. थोडक्यात कोण किती उंची गाठेल त्यास निर्बंध असतात. पण रसातळास जाण्याची प्रत्येकाची क्षमता अनिर्बंध असते. हा वैयक्तिक गुण-दुर्गुणाचा मुद्दा सामाजिक पातळीवरही असाच्या असा लागू होतो. त्यामुळे एकदा का समाजातील विविध घटकांत भेदाभेद करणे हा राजकीय सवयीचा भाग झाला की ही प्रक्रिया रोखता येणे अवघड.
स्वीकारार्हतेच्या पातळीवर हे भेद स्वदेशी आणि परदेशी नागरिकांबाबत होऊ शकतात. त्याबाबत जोपर्यंत सभ्यतेची मर्यादा पाळली जाते तोपर्यंत कोणास आक्षेप असावयाचे कारण नाही. पण देशांतर्गत पातळीवर एकमेकांतील कथित वेगळेपण जेव्हा राजकीय उद्दिष्टांसाठी वापरले जाते तेव्हा अनवस्था प्रसंग उद्भवू शकतो. धर्म या संकल्पनेतून येणारे वेगळेपण अलीकडे सर्रास राजकीय उद्दिष्टांसाठी वापरणे जणू राजमान्य झाले असले तरी ते तेथेच थांबवणे आपल्या समाजधुरीणांस शक्य झालेले नाही. आता हे भेदाभेद जात, वर्ण, वर्ग, भाषा आदी अनेक मुद्द्यांबाबत होऊ लागले असून ‘ते’ आणि ‘आपण’ असे द्वैत निर्माण करणे हे आता नित्याचे झाले आहे. तथापि ही भेदाभेदाची सवय जेव्हा निरपराध नागरिकांच्या जिवावर उठते तेव्हा त्याची दखल घेणे हे कर्तव्य ठरते.
गेल्या काही महिन्यांतील घटना आठवल्यास ही दखल का घ्यावयाची ते कळेल. देशाच्या राजधानी दिल्लीत चेहरेपट्टी आणि डोळ्यांच्या रचनेवरून काहींस चिनी ठरवले जाते, हाच चिनी असल्याचा आरोप जपानी पर्यटकांवर वाराणसीत केला जातो, केरळसारख्या राज्यात छत्तीसगडी मजुरांस बांगलादेशी समजून जमावाकडून मारले जाते, हेच बांगलादेशी दिसणे पश्चिम बंगालातून ओडिशात आलेल्या दोघा मजुरांच्या जिवावर बेतते आणि कहर म्हणजे उत्तराखंडाच्या ‘देवभूमी’ इत्यादी राज्यात आपल्याच देशातील त्रिपुरा राज्यातील दोन तरुणांवर चिनी ठरवून हल्ला केला जातो आणि त्यातील एक आपला जीव गमावतो.
या असल्या घटनांस काय म्हणावे? केरळचा अपवाद सोडल्यास अशा बहुतांश घटना भाजपशासित राज्यातच का घडतात? केरळमध्ये झाल्या प्रकाराचा तातडीने सर्वपक्षीय निषेध होतो, हे अन्य राज्यांत होण्यास अडचण काय? उत्तराखंडातील डेहराडून येथे जमावाकडून मारल्या गेलेल्या तरुणाचे वडील ‘सीमा सुरक्षा दला’च्या सेवेत असून देशाच्या सीमावर्ती प्रदेशाचे रक्षण करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. म्हणजे देशाच्या रक्षणासाठी सदैव तैनात इसमाच्या मुलांना केवळ ते अन्य भारतीयांपेक्षा वेगळे दिसतात म्हणून मारले जात असेल तर त्यातून आपण समाज म्हणून प्रगल्भतेच्या कोणत्या पायरीवर आहोत हे लक्षात येते.
अमेरिकी अध्यक्षांच्या व्हाइट हाऊसमध्ये किंवा ज्या अर्थव्यवस्थेस आपण मागे वगैरे टाकले त्या इंग्लंडच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी ‘१० डाऊनिंग स्ट्रीट’वर दीपावलीचे दिवे लावल्याचा रास्त आनंद आपण मिरवणार. आणि या देशात नाताळ साजरा करणाऱ्यांना मात्र बडवणार, हे कसे? म्हणजे ‘आपले’ (?) सण परदेशी साजरे झाले तर आपल्याला आनंद होणार; पण आपल्याच देशातील अल्पसंख्याकांनी त्यांचे सण मात्र साजरे करायचे नाहीत यास दुहेरी मापदंडदेखील म्हणता येणार नाही इतके हे वास्तव हीन दर्जाचे आहे.
या आणि अशा भेदभावाच्या सर्वच घटना दुर्दैवी असल्या तरी त्रिपुरा या आपल्याच राज्यातील तरुणाबाबत देवभूमीत जे झाले ते सर्वात करुण ठरते. अंजेल चकमा हा व्यवस्थापनशास्त्र शिकत होता आणि लवकरच एका बड्या खासगी कंपनीत दाखल होणार होता. दिवसभराच्या नैमित्तिकानंतर फुटबॉल खेळायला म्हणून अंजेल त्याच्या भावासह गेला आणि थेट मारलाच गेला. स्थानिक तरुणांची त्रिपुरातून आलेल्या त्याच्यासारख्याच अन्य काहींशी बाचाबाची झाली. हे असे प्रकार घडतात. पण नंतर जे घडले ते सर्वथा निंदनीय म्हणावे असे. त्या ‘देवभूमी’तील तरुणांनी या त्रिपुरी तरुणांवर ‘मोमो’, ‘चिनी’ अशा वंशभेदी शेलक्या विशेषणांचा भडिमार केला.
मारहाण सुरू झाल्यावर हे त्रिपुरी तरुण ‘आम्ही भारतीय आहोत’ असे वारंवार सांगत होते. पण ‘देवभूमी’तील संतप्त तरुण ते काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तो रागरंग पाहून या त्रिपुरी तरुणांनी काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. अंजेल तर मोटारसायकलवर भावास घेऊन तेथून निघून जात होता. त्या वेळी त्याच्या भावाच्या डोक्यावर मागून वार झाला आणि भावास वाचवावयास गेलेल्या अंजेलला जमावाने बेदम मारहाण केली. कोणालाही मार खाणाऱ्यांची कसलीही दया आली नाही.
यातील याहूनही अधिक गंभीर बाब अशी की या संदर्भात गुन्हाही तातडीने दाखल झाला नाही आणि त्यामुळे आरोपीही पोलिसांच्या हाती अद्याप लागलेले नाहीत. या घटनेस दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला. पण ‘देवभूमी’त सारे काही शांत शांत. हे सर्व पाहून भारताची गणना अद्याप विकसनशील देशांतच का केली जाते हे जसे कळेल तसेच विकसित होणे किती अवघड आहे याचीही जाणीव होईल. या अशा हल्ल्यांची करुण कहाणी वाचून तरी काही प्रश्न विचारी जनांस पडायला हवेत.
‘चिनी’ असणे हा या देशात गुन्हा कधीपासून झाला? आपल्या मायबाप सरकारच्या अर्थमंत्र्यांपासून अन्य सर्व धुरीण चिनी गुंतवणूक कशी आपल्या देशात यायला हवी यासाठी आणाभाका घेण्यास तयार असताना, मुंबईतील मेट्रोसाठी बोगदे खणण्यापासून सणासुदीला देवदेवतांसमोर केल्या जाणाऱ्या रोषणाईपर्यंत सर्वत्र चिनी अभियांत्रिकी, चिनी वस्तू आपल्याकडे सर्रास वापरल्या जात असताना एखादी व्यक्ती ‘चिनी’ दिसते म्हणून तिचा जीव घेतला जात असेल तर त्यातील विसंवाद समजण्याइतकी अक्कलही आपण गमावून बसलो आहोत किंवा काय, हा प्रश्न पडतो.
चीन, चिनी वगैरेचे इतकेच वावडे आपणास असेल तर आपण त्या देशास निर्यातीत मागे टाकून दाखवावे. निरपराध नागरिकांवर ते चिनी दिसतात म्हणून हात उगारण्यात- तेही जमावाकडून- कसला आला आहे पुरुषार्थ? हाच मुद्दा बांगलादेशींबाबतही लागू होतो. केवळ बांगलादेशी असणे हे आक्षेपार्ह कसे काय? अशा बांगलादेशींच्या येथील असण्यावर आक्षेप असेल तर त्यांचे येथे असणे कायद्याबरहुकूम आहे किंवा काय, हे तपासून मग त्यावर निर्णय घेतला जायला हवा. ते सरकारचे काम.
पण कोणास केवळ बांगलादेशी आहे वा तसा दिसतो (?) म्हणून त्याचा जीव घेण्याचा अधिकार जमावास दिला कोणी? अशा घटना घडत असतील तर आपल्या देशाच्या सर्वोच्च सत्ताधीशांनी त्याचा धिक्कारही करू नये? बांगलादेशातील हिंदू निरपराधाची हत्या झाली म्हणून सात्त्विक संतापाने फुरफुरणारे नैतिकतावादी आपल्याच देशातील कोणास परदेशी समजून आपल्याच देशात मारले जात असेल तर गप्प कसे? इतकी टोकाची विलगतेची भावना आपण कशी काय आपल्यातच निर्माण होऊ देतो? उद्या अमेरिकेत वा अन्यत्र एखाद्यास केवळ तो/ती भारतीय वाटतो/वाटते म्हणून अशाच मारहाणीस सामोरे जावे लागले तर आपली प्रतिक्रिया काय असेल? हा देश अजूनही जातिव्यवस्थेच्या काळ्या सावलीतून पूर्णपणे बाहेर येऊ शकलेला नाही. असे असताना हे नवे वंशविद्वेषाचे विष पुन्हा अंगी भिनू देता नये. देशास पुढे न्यायचे की मागे हे एकदा आपल्या नेत्यांनी ठरवावे.








