spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोकशाहीच्या रक्षणासाठी लढलेल्या लोकतंत्र सेनानींचा त्याग नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे – आ. सुधीर मुनगंटीवार

– बल्लारपूर येथे आपातकाल दिनानिमित्त लोकतंत्र सेनानींचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सत्कार

– आणीबाणी हा भारतीय लोकशाहीवरील काळा अध्याय; संविधान आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाचा संकल्प करण्याचे आ. मुनगंटीवार यांचे आवाहन

बल्लारपूर :- भारतीय लोकशाहीच्या इतिहासात लोकतंत्र सेनानींचा त्याग, धैर्य आणि बलिदान सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी दिलेल्या अदम्य संघर्षामुळेच भारतीय संविधान, लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याचे अस्तित्व अबाधित राहिले. या प्रेरणादायी इतिहासाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज असून लोकशाहीच्या रक्षणाचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

बल्लारपूर येथील गोपाळा सभागृहात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित आपातकाल दिनानिमित्त लोकतंत्र सेनानी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सन्मान कार्यक्रमास भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महेश शर्मा, रणजय सिंग, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, सतीश कणकम, घनश्याम बुरुडकर, वैशाली जोशी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.यावेळी लोकतंत्र सेनानी सुधीर वसंत तिखेकर, हेमंत वासुदेव डहाके, कृष्णा दत्तात्रय देशपांडे तसेच स्व. राजाभाऊ दादाजी देशकर यांच्या वतीने  मीना देशकर यांचा आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी आ. मुनगंटीवार म्हणाले, २६ जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जयंतीदिन असून तो सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. सामाजिक समता, शिक्षण आणि न्यायासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रेरणादायी आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण प्रत्येक भारतीयामध्ये स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती जागृत करते. सांस्कृतिक कार्य मंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा शासनाच्या वतीने तिथीनुसार साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याचे भाग्य मला लाभल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. मुनगंटीवार म्हणाले, २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करून संविधानिक अधिकार आणि लोकशाही मूल्यांवर मोठा आघात करण्यात आला. त्या काळात महेश शर्मा, सुधीर तिखेकर, हेमंत डहाके, कृष्णा देशपांडे, स्व. राजाभाऊ देशकर यांच्यासह असंख्य लोकतंत्र सेनानींनी कारागृहात राहून लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केला. अनेकांनी “जिएंगे तो देश के लिये, मरेंगे तो देश के लिये” या भावनेने अत्याचार सहन केले, पण लोकशाहीसमोर कधीही शरणागती पत्करली नाही.

स्वतःच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी सांगितले की, मी अवघा १२ वर्षांचा असताना माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांना पोलिसांनी अटक करून कारागृहात नेले. अशा घटना देशभरातील हजारो कुटुंबांनी अनुभवल्या. अनेक देशभक्तांना गुन्हेगारांपेक्षाही वाईट वागणूक देण्यात आली. त्यांच्या संघर्षामुळेच आज आपण लोकशाहीच्या वातावरणात मुक्तपणे जगत आहोत.

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले भारतीय संविधान हे लोकशाहीचे प्राण आहे. मात्र आणीबाणीच्या काळात या संविधानाच्या आत्म्यावरच आघात झाला. आजच्या पिढीला त्या काळातील वास्तव समजावे आणि इतिहासातील या काळ्या अध्यायाची जाणीव कायम राहावी, यासाठी अशा कार्यक्रमांचे महत्त्व अधिक असल्याचेही आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.

लोकतंत्र सेनानींच्या सन्मानाबाबत बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, मी अर्थमंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकतंत्र सेनानींना स्वातंत्र्य संग्राम सैनिकांप्रमाणे सन्मान आणि अधिकार देण्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांच्या योगदानाला न्याय मिळावा म्हणून विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केला. हा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष केलेल्या प्रत्येक लोकतंत्र सेनानीच्या त्यागाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी आ. मुनगंटीवार यांनी सर्व लोकतंत्र सेनानींना अभिवादन करत उपस्थितांना लोकशाही, संविधान आणि स्वातंत्र्य मूल्यांच्या रक्षणाचा संकल्प करण्याचे आवाहन केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.