spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी ३० जूनला लक्ष्यवेधी महामोर्चाचे यशवंत स्टेडीयम पासून आंदोलनाला सुरुवात

नागपूर :- अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासनाने तात्काळ लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन मोर्चा समिती, नागपूर च्यावतीने मंगळवार, दि. ३० जून रोजी सकाळी १० वाजता यशवंत स्टेडियम ते संविधान चौक असा लक्ष्यवेधी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समितीचे नेते अंकुश बावणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना बावणे म्हणाले की, अनुसूचित जातींमधील लाभापासून वंचित राहिलेल्या समाजघटकांना न्याय मिळावा, यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना उपवर्गीकरणाचा अधिकार दिल्यानंतरही महाराष्ट्र शासनाने अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. या महामोर्चामध्ये मांग, मातंग, चर्मकार, वाल्मिकी, मेहतर, सुदर्शन, खाटीक, मादिगा, मांग-गारोडी, बुरूड, डक्कलवार तसेच लाभापासून वंचित राहिलेल्या अनुसूचित जातींच्या विविध समाजघटकांचा सहभाग राहणार असून, सुमारे आठ ते दहा हजार समाजबांधव या मोर्चात सहभागी होतील, असा दावा समितीच्या वतीने करण्यात आला. मोर्चा यशवंत स्टेडियम येथून सकाळी १० वाजता निघून संविधान चौक येथे पोहोचणार असून, तेथे विराट धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि समाज संघटनांनी समर्थन दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

पत्रकार परिषदेला अंकुश बावणे, लहानु इंगळे, रमेश पाडण, राजेश डोंगरे, विनायक इंगोले, बुधा सुरकार, राजू सोरगिले, शंकर वानखेडे, दुर्गेश बामणे, महेश खोडके आणि रवींद्र खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Popular Articles