वाघाचा हल्यात युवक जखमी : निमटोला शिवारातील घटना
सचिन चौरसिया रामटेक १६ :- तालुक्यातील देवलापार-पवनी वनपरीक्षेत्रात वाघाचा कहर थांबता थांबत नाही आहे. वाघ आणि मानव यांच्यातील संघर्षाचा आदिवासी ग्रामीण जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. देवलापार-पवनी वनक्षेत्रात अनेक वन्यजीवांचा वावर वाढल्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. पवनी नियंत्रण वनपरीक्षेत्रातील कक्ष क्र.-२६४ येथे वाघाच्या हल्ल्यात २८ वर्षीय युवक जखमी झाला.
माहितीनुसार, निमटोला येथील रहवासी सुदाम रामदास भलावी (२८) बकरी चरण्यासाठी निमटोला-कामठी जंगला जवळच्या शिवारात गेला. मागून झुडुपात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर हल्ला चढवीला. या हल्यात तो युवक गंभीर जखमी झाला. (दि.१३) रविवारी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. सुदाम हा शेळीपालन व्यवसाय करतो आणि त्याच्या शेळ्या रोज गावालगतच्या शेतात व शिवारात चारायला नेतो. तो नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी शेळ्या घेऊन निमटोला-कामठी शिवारात गेला होता. दुपारी शेळ्या चारा खात असताना तो शेळ्यांवर लक्ष्य ठेऊन उभा होता. त्यातच दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढविला. हा प्रकार लक्षात येताच शिवारातील शेतकरी व मजुरांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघ आल्यापावली जंगलाच्या दिशेने निघून गेला. नागरिकांनी सुदामला जखमी अवस्थेत देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात नेले व वन अधिकाऱ्यांना सूचना दिली. प्रथमोपचारानंतर त्याला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली




