spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

“तुमच्या चेहऱ्यावरील हास्य उन्हापेक्षाही शीतल!” 

– खसाळा नगरीत भाऊ कदम यांच्या विनोदी शैलीने ग्रामविकासाचा जागर

कामठी :- “विदर्भातील ऊन तापलेले असले, तरी खसाळावासीयांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि तुमचे प्रेम त्या उन्हापेक्षाही शीतल आहे. तुमची प्रगती आणि गावाची शिस्त पाहून आज माझं मन तृप्त झालं,” अशा शब्दांत मराठी चित्रपटसृष्टीचे लाडके अभिनेते भाऊ कदम यांनी खसाळा येथील नागरिकांशी संवाद साधला.

निमित्त होते ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’ अंतर्गत आयोजित भव्य सोहळ्याचे.

लोकप्रियतेचा महापूर आणि जल्लोषात स्वागत

सोमवारी सकाळी भाऊ कदम यांचे खसाळा गावात आगमन होताच वातावरणात एकच जल्लोष निर्माण झाला. लेझिमच्या तालावर आणि खुल्या जीपमधून काढलेल्या रॅलीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले होते. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी घराघरातून भाऊ कदम यांच्यावर पुष्पवृष्टी केली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.

भाऊ कदम यांच्या हस्ते ‘आयुष्यमान कार्ड’ व पट्टे वाटप

केवळ मनोरंजनच नव्हे, तर समाजहिताचा संदेश देत भाऊ कदम यांच्या हस्ते गावातील लाभार्थ्यांना ‘आयुष्यमान भारत’ कार्ड आणि जागेच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फुटाणे, तहसीलदार गणेश जगदाळे, गट विकास अधिकारी यावले, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, आणि पंचायत समितीचे माजी सभापती रडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

सरपंच जयश्री इंगोले यांनी मांडला प्रगतीचा पाढा

आपल्या भाषणात सरपंच सौ. जयश्री इंगोले यांनी गावाच्या डिजिटल क्रांतीबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, “आमच्या गावाने केवळ ४० टक्क्यांवरून १०० टक्के टॅक्स वसुलीपर्यंत मजल मारली आहे. आज गावकरी घरी बसून डिजिटल स्कॅनरद्वारे कर भरत आहेत. सीसीटीव्हीमुळे गाव सुरक्षित झाले असून, झेंडू लागवड आणि सोलर प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही शाश्वत विकासाकडे वाटचाल करत आहोत.”

नियोजनावर ‘भाऊ’ फिदा

भाऊ कदम यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले. “पाण्याचे थेंब वाचवणारे वॉटर हार्वेस्टिंग असो किंवा गावाची सुरक्षितता वाढवणारे सीसीटीव्ही, खसाळा गावाने नियमात बसून जे काम केले आहे ते आदर्शवत आहे. गावकऱ्यांनी असाच एकोपा टिकवून ठेवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

या सोहळ्याला तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, शासकीय अधिकारी आणि कामठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलोडे यांनी केले तर संचालन ग्राम विकास अधिकारी तुषार गावंडे यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.