मुंबई :- सलग 25 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असूनही मुंबईकरांच्या पाणी, रस्ते, आरोग्य या प्राथमिक समस्या उबाठा गटाला सोडविता आल्या नाहीत. मुंबईचे सर्वार्थाने वाटोळे केलेला उबाठा गट हाच आपला खरा शत्रू आहे हे मुंबईकरांनी ओळखले आहे. अशा उबाठा गटाला मुंबईकर आगामी महापालिका निवडणुकीत घरी बसवण्याचे काम करतील, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. बन बोलत होते. मुंबई महापालिका निवडणुकीत उबाठा गट आणि राज ठाकरे एकत्र आले तरी शिल्लक सेना व किंचित सेनेला नाकारत मतदार भारतीय जनता पार्टीलाच निवडून देतील, असा विश्वासही बन यांनी व्यक्त केला.
बन यांनी सांगितले की, 25 वर्षे मुंबई महापालिकेची सत्ता असूनही उद्धव ठाकरे यांना मुंबईच्या मूलभूत समस्यांही सोडविता आल्या नाहीत. अडीच वर्षे सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या मेट्रो सारख्या प्रकल्पांना स्थगिती दिली. काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हेच आपले खरे शत्रू आहेत हे मुंबईच्या जनतेने ओळखले आहे.
काँग्रेसने स्वबळाची घोषणा करून नेहमीप्रमाणे आपल्या मित्रपक्षांचा विश्वासघात करत महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडवल्या आहेत. आपल्या मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसणे ही काँग्रेसची जुनी खोड आहे. काँग्रेस तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार याचे भाकित आम्ही आधीच केले होते आणि तुम्हाला सावध केले होते. तरीदेखील तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन बसलात, सोनिया सेनेच्या दारात जाऊन बसलात. आता ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ या उक्तीनुसार काँग्रेस ने मुंबई महापालिका निवडणुकीत तुम्हाला दूर लोटले आहे. आपली मुस्लिम व्होट बँक दूर जाऊ नये यासाठी काँग्रेसने तुमच्या सोबत घात केला आहे अशी घणाघाती टीकाही बन यांनी केली.
शिंदे सेनेचा कोथळा अमित शाह काढणार या राऊत यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना बन म्हणाले की, विधानसभा निवडणुकीवेळी राज्याच्या जनतेने उबाठा गटाचा कोथळा बाहेर काढला आहेच. आता महापालिका निवडणुकीत देखील उबाठा गटाचा कोथळा बाहेर काढण्याचे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे कोथळ्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये. राज्याच्या जनतेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला आशीर्वाद दिले आहेत. देवेंद्रजी, एकनाथ शिंदे, अजित पवार हे एकमताने पुढे चालत आहेत असेही त्यांनी नमूद केले.
शिंदे सेनेतील आमदार फुटणार या राऊतांच्या भविष्यवाणीवर कोरडे ओढताना श्री . बन म्हणाले की , उबाठा चे 40 आमदार तुमच्या नाकावर टिच्चून बाहेर गेले. सरकारमध्ये असताना आणि मविआ चे शिल्पकार असताना तुम्हाला त्याचा थांगपत्ता लागला नाही. आता सरकारच्याबाहेर आहात आणि घरात बसून तुम्ही मांडे खात आहात. श्री. एकनाथ शिंदे संपूर्ण पक्ष बांधण्यासाठी, सांभाळण्यासाठी सक्षम आहेत. भांडुपच्या गाढवनाक्यावर बसून भविष्यवेत्ते बनण्याचे धंदे बंद करा. एकही भविष्य खरे ठरले नाही.
संजय राऊत यांच्या तब्येतीला लवकर आराम पडो
उबाठा गटाचे प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे. राजकारणात असलो तरी कुणाचे वाईट चिंतण्याची आपली संस्कृती नाही. म्हणूनच खा. राऊत हे लवकर बरे व्हावेत. मात्र राऊतांनी आजाराचे राजकारण करू नये. राऊत बरे व्हावेत अशा भाजपाच्या सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. पण आपण जेलमध्ये गेलो म्हणून हा आजार झाला असे म्हणणे चुकीचे आहे. असे असते तर सर्व कारागृहातील कैद्यांना आजार झाला असता, असे बन म्हणाले .




