रामटेक, सचिन चौरसिया २९ : रामटेक वनपरिक्षेत्रातील बोरडा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सत्रापूर गावात दीड महिन्यांपासून एका हिंसक प्राण्याने धुमाकूळ घातला असतानाच, काल (२८ जुलै) दुपारी २ वाजताच्या सुमारास बिबट्याने भरदिवसा एका सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सत्रापूर शिवारातील अस्मिता ऑरगॅनिक फार्मवर कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक रामचंद्र शेंदरे (३५, रा. सरखा, बोरडा) हे आपल्या कर्तव्यावर असताना फार्मजवळील पाण्याच्या पाईपमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी उपस्थित कामगारांनी आरडाओरड केल्याने बिबट्या तेथून पसार झाला.
तत्काळ जखमी रामचंद्र शेंदरे यांना रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले आहे.
या घटनेची माहिती रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांना देण्यात आली असून, त्यांनी तात्काळ मनसरचे क्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडीमेश्राम यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा तयार करण्यास सांगितले आहे.
या बिबट्याच्या हल्ल्याने बोरडा, सरखा आणि सत्रापूर या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या वनप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे नागपूर जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून, गावकरी आणि शेतकऱ्यांमध्ये वनविभागाच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. जखमींना वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
नागपूर जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून वनप्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाली असून, आता आणखी किती लोकांना या हल्ल्यांना बळी पडावे लागणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वन अधिकारी नेमके काय करत आहेत, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.








