spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

धापेवाडा बुद्रुकमध्ये विजेच्या कडाक्याने तीन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू 

पाटील कुटुंबावर दुहेरी आघात, एकुलतीच मुलगी पिहूवर दुःखाचा डोंगर
सतीश नांदे, कळमेश्वर २८ : तालुक्यातील धापेवाडा बु येथे बुधवार, दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी तीन वाजून पाच मिनिटांच्या सुमारास झालेल्या ढगांच्या कडकडाटासह पावसामुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. शेतात काम करीत असताना अचानक वीज कडाडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतकांमध्ये वंदना प्रकाश पाटील (37), त्यांचा मुलगा ओम प्रकाश पाटील (18) आणि निर्मला रामचंद्र पराते (60) सर्व राहणार धापेवाडा  या महिलांचा समावेश आहे.
घटनेत सर्वांत मोठा आघात पाटील कुटुंबावर झाला आहे. दोन वर्षांपूर्वी वंदना पाटील यांचे पती प्रकाश पाटील यांचे निधन झाले होते. त्यानंतर आई आणि मुलगा शेतमजुरी करून कुटुंब सांभाळत होते व मुलगी पिहूचे शिक्षण सुरू ठेवले होते. परंतु, आजच्या या दुर्दैवी घटनेत आई आणि मुलगा दोघेही दगावल्याने घरात केवळ १५ वर्षीय पिहू प्रकाश पाटील हीच एकुलती एक उरली आहे.
वीज कोसळल्याचा जोरात आवाज झाल्याने आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी त्वरित सामाजिक कार्यकर्ते दिवाकर कडू यांना कळवले. दिवाकर कडू यांनी तत्काळ तहसीलदार, तलाठी व ग्रामपंचायत सचिवांना माहिती दिली. घटनास्थळी सचिव ईश्वर धुर्वे, कोतवाल मंगेश पारसे, पटवारी नितेश मोहितकर यांनी धाव घेऊन पंचनामा सुरू केला.
ही घटना नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे प्रशासन व गावकरी हादरले असून गावात शोककळा पसरली आहे.
गावभर शोककळा मृत्यूने कुटुंब पोरके केले
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे धापेवाडा गावावर शोककळा पसरली आहे. आई–मुलगा गमावून पाटील कुटुंब उद्ध्वस्त झाले असून गावकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्ते दिवाकर कडू यांनी प्रशासनाने कुटुंबाला तातडीने मदत करावी, अशी मागणी केली आहे.
गावभर शोककळा – पिहूचे भवितव्य धोक्यात
या दुर्दैवी घटनेमुळे धापेवाडा गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे पाटील कुटुंबातील वंदना व ओम यांच्या मृत्यूने पिहूवर काळोखाचे सावट दाटले आहे. आई–वडील व भाऊ गमावून पंधरा वर्षीय पिहू आता एकटी उरली आहे.
गावकऱ्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत. “या लेकराला सरकारने तातडीने आधार द्यावा, तिचे शिक्षण आणि भवितव्य सुरक्षित करावे” अशी मागणी गावकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
मदतीची तातडीची गरज
पाटील कुटुंबावर ओढवलेल्या या शोकांतिकेनंतर आता गावकरी आणि समाजमित्रांनी एकमुखाने आवाहन केले आहे की, सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी.
कारण आता पंधरा वर्षीय पिहूच आपल्या आयुष्याशी लढत उभी राहणार आहे. तिच्या भवितव्यासाठी समाजाचा हातभार अत्यावश्यक असल्याचे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.