– एलसीबी गोंदियाची धडाकेबाज कारवाई; ३० टन १०७ किलो तांदूळ व ट्रकसह १८.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पंकज परशुरामकर,इनसाइडर न्यूज टुडे
नवेगाव बांध :- रावणवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या तांदळाने भरलेल्या ट्रक लुटीचा गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश करत १८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालकाला चाकूचा धाक दाखवून झाडाला बांधत ट्रक लुटणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील ट्रक चालक नवीन रामचंद्र मौर्य (वय ३५) यांनी १४ जुलै रोजी मध्य प्रदेशातील चाकघाट येथून ३० टन ७६५ किलो तांदूळ घेऊन अर्जुनी (जि. गोंदिया) येथे निघाले होते. १६ जुलैच्या मध्यरात्री सावर गावातील बसथांब्यावर ट्रक उभा करून ते झोपले असताना, १७ जुलै रोजी पहाटे सुमारे ४ वाजता एका अनोळखी व्यक्तीने पाणी मागितले. चालकाने पाण्याची बाटली दिल्यानंतर आणखी तीन साथीदार तेथे आले. चौघांनी मिळून चालकाला मारहाण करत चाकूचा धाक दाखवला, त्याचे हातपाय बांधून झाडाला बांधले आणि तांदळासह ट्रक घेऊन पसार झाले.या प्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ११८(१), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक व तांदळाची एकूण किंमत सुमारे १८ लाख रुपये असल्याने पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले.अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेवनचंद सिंगनजुडे यांनी दोन विशेष पथके तयार करून तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीस गेलेला ट्रक व तांदूळ कोहका परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर १९ जुलै रोजी कोहका येथून संशयित संजयकुमार राजकुमार दमाहे (वय २०) याला ताब्यात घेण्यात आले.चौकशीत दमाहे याने साथीदारांसह ट्रक लुटल्याची कबुली दिली. त्याच्या माहितीनुसार ट्रक कोहका-भानपूर मार्गावर नेऊन तांदूळ विविध ठिकाणी उतरवून लपविण्यात आला होता.पोलिसांनी आरोपीच्या कबुलीनुसार छापे टाकून ११ टन ३२० किलो, ११ टन ४६० किलो आणि ७ टन ३२७ किलो असा एकूण ३० टन १०७ किलो तांदूळ तसेच टाटा कंपनीचा ट्रक जप्त केला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १८ लाख १३ हजार ६९९ रुपये इतकी आहे.या गुन्ह्यातील इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी रावणवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.अवघ्या दोन दिवसांत गंभीर लुटीचा उलगडा करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक रेवनचंद सिंगनजुडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही यशस्वी कारवाई करण्यात आली.





