spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रँकर्स हबच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा; करिअर नियोजन व कौशल्याधारित शिक्षणाचा दिला मंत्र

– विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक विचारसरणी आणि पर्यायी करिअर पर्यायांची गरज अधोरेखित

कामठी :- बेसा येथील रँकर्स हबतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन सोहळा शनिवारी (ता. १८) श्री भवानी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी, १२ वी तसेच अबॅकस विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासोबतच विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, कौशल्याधारित शिक्षण आणि सकारात्मक विचारसरणीचे महत्त्व पटवून देणारा हा सोहळा विद्यार्थी व पालकांसाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर नीता ठाकरे आणि परिवहन सभापती मंगला खेकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक स्वागत नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचे मान्यवरांनी कौतुक करत त्यांच्यातील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी विविध शाळा व महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, पारितोषिके आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी केवळ गुणांच्या स्पर्धेत न अडकता स्वतःच्या कौशल्यांचा विकास करण्यावर भर द्यावा, असा संदेश मान्यवरांनी दिला.

मार्गदर्शनपर सत्रात डॉ. नानोटी यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील संघर्ष स्वीकारून यश मिळविण्याचा मूलमंत्र दिला. भविष्यातील स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नसून कौशल्याधारित शिक्षण (स्किल बेस्ड लर्निंग) हे यशाचे महत्त्वपूर्ण साधन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी आणि क्षमतांचा योग्य मेळ साधत शिक्षणाची दिशा ठरवावी, असे आवाहन त्यांनी केले.

वैज्ञानिक अजिंक्य कोत्तावार यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. आजच्या बदलत्या शैक्षणिक आणि व्यावसायिक वातावरणात विद्यार्थ्यांनी करिअरसाठी केवळ एकाच पर्यायावर अवलंबून न राहता प्लॅन ‘ए’, प्लॅन ‘बी’ आणि प्लॅन ‘सी’ असे पर्यायी पर्याय तयार ठेवावेत, असा महत्त्वपूर्ण सल्ला त्यांनी दिला.

महापौर नीता ठाकरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सकारात्मक विचारसरणी, सातत्यपूर्ण परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, असे सांगितले. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरून न जाता त्यातून शिकत पुढे वाटचाल करावी, असेही त्यांनी नमूद केले. तसेच रँकर्स हबच्या शैक्षणिक आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व्यवस्थापकीय संचालक निखिल मारगमवार यांनी केली. मोहिनी शिवणकर यांनी आभार प्रदर्शन केले. संस्थापक पूनम दीपक निपाने, संचालक डॉ. दीपक निपाने यांच्यासह पारस सर, प्रथमेश, पुष्पा शेखावत , कीर्ती मालेवार, हर्षल लेंडे आणि प्रतीक गरस्कर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. रँकर्स हबच्या संपूर्ण चमूच्या अथक प्रयत्नांमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Popular Articles