मुंबई २६: राज्यातील राजकारणात वराह जयंतीवरून चांगलाच वाद पेटला आहे. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी 25 ऑगस्ट रोजी चेंबूर, नवी मुंबई आणि ठाणे येथे वराह जयंती साजरी केली. यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका सुरू केली आहे. विशेष म्हणजे, या निर्णयावरून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंना थेट टोला लगावला आहे.
मिटकरींचा उपरोधिक सल्ला
नितेश राणेंनी आयोजित केलेल्या वराह पूजन आणि महाआरतीवर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले –
“रानडुक्कर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करतात. शेतकऱ्यांचे दुखणे ऐकून घेण्याऐवजी सरकारमधीलच मंत्री शेतकऱ्यांच्या शत्रूची जाहीर आरती करत असतील, तर हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. जर वराह पुजनाचं एवढं वेड असेल, तर त्यांनी घरात दोन-चार डुक्करे बांधावीत आणि रोज आरती करावी. वराह म्हणजे डुक्करच, याला आमची काही हरकत नाही.”
सचिन सावंत यांचा भाजपवर सवाल
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील नितेश राणे आणि भाजपवर टीकास्त्र सोडले.
“भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला म्हणून भाजप वराह जयंती साजरी करत आहे, मग त्यांनी मत्स्य अवतार घेतला म्हणून 31 मार्च रोजी मत्स्य जयंती का साजरी केली नाही? एवढंच नाही, मासे ताव मारून खाताना त्यांना काय आठवतं?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसेनेची उपरोधिक टीका आणि राणेंचं प्रत्युत्तर
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने सोलापूरमध्ये वराह जयंतीच्या निमित्ताने भाजपसह नितेश राणे यांच्यावर उपरोधिक टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले –
“उबाठाला मुल्ला-मौलवी जवळचे वाटतात तसेच उद्धव ठाकरेंचे अर्धं धर्मांतर झालं आहे. वराह म्हणजे भगवान विष्णूंचा तिसरा अवतार आहे, आणि जर वराह जयंतीविरोधात आंदोलन करत असाल, तर यापेक्षा मोठा हिंदूंचा अपमान नाही.”








