नागपूर :- मेळघाट व्याघ्रप्रकल्प परिसरात २०१३ साली वाघांच्या शिकारीचे मोठे सत्र उघडकीस आले. त्यावेळी मेळघाट वनविभागाने अतिशय उत्तम कामगिरी पार पाडत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. शेकडो आरोपींना अटक करण्यात आली आणि अनेकांना शिक्षाही झाली. तत्कालीन वनाधिकारी विशाल माळी यांच्या संकल्पनेतून त्यावेळी मेळघाट वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा स्थापन करण्यात आली, जी आजही वाघांच्या शिकार प्रकरणात उत्कृष्ट कामगिरी करत आहे.
मेळघाट व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत २०१३ साली उघडकीस आलेल्या वाघांच्या शिकार प्रकरणातील फरार शिकाऱ्याला तब्बल १२ वर्षानंतर अटक करण्यात आली. वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा मेळघाट यांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली. दोन वर्षांपूर्वी याच शाखेने आणखी एका शिकाऱ्याला अटक केली होती. न्यायालयात त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले होते. अकोट वन्यजीव विभागाच्या कार्यक्षेत्रात २०१३ साली वाघ शिकार प्रकरणातील फरार शिकारी शीतला उर्फ गजेंद्री हिला मध्यप्रदेशातील मंडला येथून यशस्वीरीत्या अटक करण्यात आली.
वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. ही महत्त्वपूर्ण कारवाई वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प तसेच अकोट वन्यजीव विभाग यांच्या संयुक्त व समन्वयात्मक प्रयत्नातून पार पडली. या प्रकरणाचे तपास अधिकारी गणेश टेकाळे असून ही कारवाई मेळघाट व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक व वनसंरक्षक आदर्श रेड्डी तसेच अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक राहुल टोलिया यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेच्या चमूत विशाल बन्सोड, स्वप्नील राऊत, दिनेश केंद्रे, विशाल उमाटे, अनंता नायसे, विशाल सुरत्ने यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
अटकेतील शिकाऱ्याला अकोट प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असताना त्याला तीन दिवसांची वनकोठडी मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने शिकाऱ्याला २६ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दीर्घकाळ फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन तिला अटक करणे ही वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी असून, सदर अटकेमुळे वन्यजीव गुन्ह्यांविरोधातील कारवाईस अधिक बळ मिळाले आहे. वन्यजीव संरक्षणासाठी अशा प्रकारच्या संयुक्त व प्रभावी कारवाया भविष्यातही अधिक तीव्रतेने राबविण्यात येतील, असे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




