– गडमी शिवारातील घटना; पशुपालक व नागरिक भयभीत
खापा :- सावनेर तालुक्यातील गडमी शिवारात एका वाघ अथवा बिबट्याने गोठयातून वासराची शिकार केल्याची घटना दि. १ जानेवारीच्या मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अशा सतत होत असलेल्या जनावरांच्या शिकारीमुळे पशुपालक व शेतकरी भयभीत झाले आहे. १ जानेवारीच्या रात्री गडमी येथील गोपालक विनोद चौधरी यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात असलेल्या जनावरांचा चारापाणी करुन रात्रीला घरी गेले. सकाळी ७ वाजता दूध काढण्यासाठी गोठ्याकडे गेले असता गोठ्यातील एकूण जनावरांपैकी २ वर्षे वय असलेल्या वासरु गळ्याचा भाग खाल्ल्या अवस्थेत दिसले आणि बाकी जनावरे भयभीत अवस्थेत ओरडतांना दिसले. घटनेची माहिती समजताच घटनास्थळी गावातील शेतकरी व नागरिकांनी गर्दी केली. खापा वन विभागाचे कर्मचारी महेश कुथे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. हा परिसर जंगलाला लागून असल्याने शिवारात अशा घटना घडत आहे. कुणाच्या बकऱ्या तर कुणाचे वासरू, कुत्रे व अन्य पाळीव प्राणी अशा होणाऱ्या जनावराच्या शिकारी मुळे येथील पशुपालक शेतकरी त्रस्त व भयभीत झाला आहे. वन विभागातर्फे होणाऱ्या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होत आहे. शेतकरी भीती बाळगून शेतात कार्य करीत आहे. गोपालक विनोद चौधरी तात्काळ आर्थिक मदत मिळावी व जंगली हिंसक जनावरांचा कायमचा बंदोबस्त लावावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र काकडे यांनी केली आहे.




