किशोर साहू, मौदा :- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे, विदर्भ प्रांताच्या वतीने आयोजित १८ व्या राज्यस्तरीय छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे रामटेक येथील स्व. धनश्यामराव किमतकर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका उषा राऊत, स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सुभाष चव्हाण, तर निमंत्रक म्हणून विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष नामदेव राठोड उपस्थित होते.
या संमेलनात महाराष्ट्रातील विविध भागांतील कवींनी सहभाग नोंदवत आपल्या कविता सादर केल्या.या राज्यस्तरीय कवी संमेलनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली येथील मुख्याध्यापिका व कवयित्री अनुराधा धुर्डे यांनी ‘अनुताई’ या टोपणनावाने सहभाग नोंदविला. त्यांनी ‘काय दोष होता त्या माऊलीचा?’ या सत्य परिस्थितीवर आधारित सामाजिक आशयाच्या कवितेचे प्रभावी सादरीकरण केले.
अनु यांच्या लेखणीची वैशिष्ट्ये म्हणजे सत्य परिस्थितीची जाण, परखडपणा, सामाजिक वास्तवावर प्रश्न उपस्थित करण्याचे धाडस आणि समाजप्रबोधनाची भूमिका. त्यांच्या कविता केवळ भावनिक अभिव्यक्ती न राहता विद्यार्थी घडविणे, समाज घडविणे आणि सामाजिक जाणीव जागृत करण्याचा संदेश देतात.त्यांच्या आशयपूर्ण व प्रभावी कविता सादरीकरणाची दखल घेत आयोजकांच्या वतीने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन कवयित्री अनुराधा धुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असतानाच साहित्य क्षेत्रातही आपल्या संवेदनशील आणि परखड लेखणीने सामाजिक वास्तव मांडणाऱ्या अनुराधा धुर्डे यांच्या या साहित्यिक यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे, हे विशेष !








