spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आश्रमशाळेतील ११५ विद्यार्थी गायब असल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्या ‘तोतया’ पत्रकाराचा पर्दाफाश; पांढरकवडा पोलिसांत गुन्हा दाखल

– नियम धाब्यावर बसवून शाळेत घुसखोरी; अल्पवयीन विद्यार्थ्यांची गोपनीयता भंग करत शिक्षकांची बदनामी केल्याचा गंभीर प्रकार

पांढरकवडा :-  पत्रकारितेच्या नावाखाली सनसनाटी निर्माण करून प्रशासनाची आणि शिक्षकांची बदनामी करणाऱ्या पांढरकवडा येथील एका स्वयंघोषित पत्रकाराचे बिंग अखेर फुटले आहे. केळापूर तालुक्यातील बोथ येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील १२५ पैकी ११५ विद्यार्थी गायब असल्याचा खोटा आणि दिशाभूल करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी पांढरकवडा येथील सलिम मनियार याच्याविरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता शाळेच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश करणे, अल्पवयीन आदिवासी विद्यार्थ्यांचे चेहरे उघड करून त्यांची सुरक्षितता धोक्यात आणणे आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करणे या गंभीर गुन्ह्यांखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा बोथचे प्रभारी मुख्याध्यापक नारायण भरतराव गायकवाड (वय ३९) यांनी याप्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास इन्स्टाग्रामवरील `@salimmaniyars` या अकाउंटधारक सलिम मनियार याने कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी न घेता थेट आश्रमशाळेच्या आवारात घुसखोरी केली. विशेष म्हणजे, शाळेच्या दर्शनी भागात ‘चित्रीकरणास सक्त मनाई आहे’ असा स्पष्ट सूचना फलक लावलेला असतानाही, त्याला केराची टोपली दाखवत त्याने थेट फलकाजवळच उभे राहून मोबाईलद्वारे चित्रीकरण सुरू केले.

यावेळी शाळेतील उपस्थित शिक्षकांनी त्याला दिवाळीच्या सुट्ट्या आणि पालक भेटींसंदर्भातील खरी वस्तुस्थिती समजावून सांगितली होती. मात्र, केवळ सोशल मीडियावर व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापोटी त्याने शिक्षकांचे म्हणणे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले. एवढेच नव्हे तर, त्याने आश्रमशाळेतील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचे चेहरे स्पष्ट दिसतील अशा पद्धतीने चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले.

संबंधित व्हिडिओवर ‘शासकीय आश्रमशाळा बोथ येथील १२५ पैकी ११५ विद्यार्थी गायब’ आणि ‘प्रिन्सिपल गायकवाड यांची लापरवाही’ असा खोटा व भडक मजकूर टाकून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. आदिवासी आश्रमशाळेतील ११५ विद्यार्थी एकाच वेळी गायब झाल्याच्या या बेजबाबदार दाव्यामुळे शेकडो पालकांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होण्याचा धोका होता. तसेच, मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप करून त्यांची व शाळेची प्रतिमा मलीन करण्याचा नीच प्रकार यातून समोर आला आहे.

शासकीय आश्रमशाळांमधील अल्पवयीन विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि गोपनीयता अत्यंत संवेदनशील विषय असून, तिथे कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी अनिवार्य असते. मात्र, सर्व कायदे आणि नियम पायदळी तुडवून बालकांच्या हक्कांचे उल्लंघन करणाऱ्या या प्रवृत्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातून होत आहे. प्रभारी मुख्याध्यापक नारायण गायकवाड यांच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी सलिम मनियार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. अशा प्रकारे खोट्या बातम्या पसरवून प्रशासनाला वेठीस धरणाऱ्यांवर आता पोलिसांचा वचक बसणार आहे

Popular Articles