मुंबई :- नोंदणी व मुद्रांक विभागाच्या कामकाजात कायदेशीर अचूकता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुखता वाढविण्यासाठी मुंबई विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक व्यवहारांचे विवरणपत्र, डाटा व्हॅलीडेशन तसेच नोंदणी व मुद्रांकविषयक कायदेशीर तरतुदींवर विशेष प्रशिक्षण देण्यात आले. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, रवींद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण नुकतेच आयोजित करण्यात आले होते.
नोंदणी उपमहानिरीक्षक, मुंबई विभाग, राजू थोटे यांच्या आयोजनातून बांद्रा येथील प्रकाशगड येथे झालेल्या या प्रशिक्षणास मुद्रांक जिल्हाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नोंदणी प्रक्रियेत कायदेशीर बाबींची अचूक अंमलबजावणी करताना नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक सेवा कशी देता येईल, याबाबत प्रशिक्षणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
मुंबईचे अपर मुद्रांक नियंत्रक सुनील महिंद्रकर यांनी नागरिकांशी संबंधित नोंदणी प्रक्रिया कायदेशीर चौकटीत राहून अधिक सुलभ व पारदर्शक करण्यावर भर दिला. नोंदणी उपमहानिरीक्षक राजू थोटे यांनी ई-म्युटेशनमधील ‘स्कीप ऑप्शन’चा वापर, सादर करावयाचे प्रस्ताव तसेच नोंदणी अधिनियम, 1908 मधील कलम 18-अन्वये नोंदणीस प्रतिबंधित दस्तऐवज याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संबंधित कायदेशीर तरतुदींचे व्यावहारिक विश्लेषणही त्यांनी केले.
एसएफटी रिपोर्टिंग, पॅन व्यवहार आणि डाटा व्हॅलिडेशनवर मार्गदर्शन
प्रशिक्षण सत्राच्या अध्यक्षस्थानी आयकर विभागाच्या इंटेलिजन्स अँड क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन, मुंबईचे डॉ. संतोष माणकोसकर होते. त्यांनी “सुलभ नोंदणी नागरिकांसाठी, योग्य महसूल राज्यासाठी आणि अचूक माहिती देशासाठी” हा संदेश देत नोंदणी प्रक्रियेत अचूक माहितीचे महत्त्व अधोरेखित केले.आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक पुगालिया चंदन राजेंद्र, अतुल कुमार पांडये तसेच सहसंचालक क्षितीज यांनी प्रशिक्षणात मार्गदर्शन केले. आर्थिक व्यवहारांचे विवरणपत्र विषयावरील सत्रात आर्थिक व्यवहारांचे विवरणपत्र रिपोर्टिंग, फॉर्म 165, डाटा व्हॅलिडेशन, पॅनशी संबंधित व्यवहारांची अचूक नोंद आणि रिपोर्टिंगदरम्यान येणाऱ्या व्यावहारिक अडचणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सह दुय्यम निबंधक वर्ग-२, मुंबई क्र. १७, सुधाकर मोरे यांनी नोंदणी अधिनियम, 1908 मधील विविध तरतुदींचे स्पष्टीकरण केले. सह दुय्यम निबंधक वर्ग-२, मुंबई क्र. ८, प्रशांत कुमटकर यांनी मुद्रांक अधिनियमातील विविध महत्त्वाच्या तरतुदींचे सविस्तर विश्लेषण केले. प्रशिक्षणामुळे नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायदेशीर तरतुदींची अधिक स्पष्ट माहिती मिळण्यासोबतच आर्थिक व्यवहारांची अचूक माहिती संकलित व अहवालित करण्यास मदत होणार आहे. यामुळे नोंदणी प्रक्रियेतील अचूकता, पारदर्शकता आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता अधिक प्रभावी होण्यास हातभार लागणार आहे.सह जिल्हा निबंधक वर्ग-१, मुंबई शहर, प्रज्ञा सावंत यांनी आभार मानले.





