– १००० रुपयाची लाज घेतांना निरीक्षक व दलालाला अटक
– तब्बल ४ लक्ष ३१ हजार २९० रुपये रोख रक्कम जप्त
सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील मनसर-कांद्री चेक पोस्टवर परिवहन विभागाच्या मोटार वाहन निरीक्षकाला व त्याचा अखत्यारीतील खाजगी दलालाला बुधवार (दि.११) मार्चला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. मोटार वाहन निरीक्षक अभिजीत मधुकर टाले व खाजगी दलाल सुशील विनोद रामटेककर यांना १ हजार रुपयाची लाज घेताना त्यांच्याच कार्यालयात रंगेहात अटक करण्यात आली. सोबत कार्यालयाची झडतीत तब्बल ४ लक्ष ३१ हजार २९० रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या कारवाईने प्रादेशिक परिवहन विभागात खळबळ उडाली आहे. मनसर कांद्री चेक पोस्टवरून मोठे ट्रक, ट्रेलर पास करण्यासाठी १००० ते १५०० रुपयाची लाज परिवहन विभागाची निरीक्षक व त्या अखत्यारीतील दलाल मागत असल्याची तक्रार एका ट्रेलर चालकायाने एसीबी ला केली होती. मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बुधवार (दि.११) मार्चला चेक पोस्ट परिवहन कार्यालयात सापळा रचुन कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोटार वाहन निरीक्षक अभिजित मधुकर टाले यांच्या अखत्यारितील खाजगी दलाल सुशिल विनोद रामटेककर यांनी १००० रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष पकडले गेल्याची माहिती आहे. यावेळी मनसर कांद्री चेकपोस्ट परिवहन कार्यालयाची झडती घेतली असता तब्बल ४ लक्ष ३१ हजार २९० रुपये रोख रक्कम आढळून आली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून रामटेक पोलीस स्टेशन (नागपूर ग्रामीण) येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई डॉ. दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, एसीबी नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.