spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पवनी परिसरात दहशतवाद विरोधी पथकाचा धाडस; १ कोटी ८ लाखांच्या मुद्देमालासह दोन रेती टिप्पर जप्त

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि चोरट्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. पवनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या निलज फाटा येथे ही कारवाई करण्यात आली असून, अधिकृत परवान्यापेक्षा जास्त रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परसह एकूण १ कोटी १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल रमेश थेरे (३१) आणि महेश माधवराव पंचभाई (२९, दोघेही रा. वलनी, ता. पवनी) या दोन वाहन मालक-चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी व त्यांचे कर्मचारी पवनी परिसरात गस्त घालत असताना, त्यांना चंद्रपूरकडून दोन टिप्पर अवैध रेती घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने निलज फाटा येथे नाकेबंदी करून टिप्पर क्रमांक MH-40-CT-2296 आणि MH-40-BF-9696 यांना थांबवले. वाहनांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे प्रत्येकी ४ ब्रास रेती नेण्याचा कायदेशीर परवाना होता. मात्र, दोन्ही टिप्परमध्ये प्रत्येकी ९ ब्रास रेती भरलेली आढळून आली. म्हणजेच परवान्यापेक्षा ५ ब्रास जादा रेतीची विनापरवाना चोरटी वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवला जात असल्याचे स्पष्ट झाले.

या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी ५० लाख रुपये किमतीचे दोन टिप्पर आणि त्यातील १ लाख ८ हजार रुपयांची रेती असा एकूण १ कोटी १ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गणेश बैरागी, पोलीस शिपाई सरवरे व त्यांच्या पथकाने पार पाडली. या प्रकरणी पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.