spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धक्कादायक! लाखनी परिसरात विद्युत प्रवाहाने दोन रानगव्यांची शिकार; शेतकरी वनविभागाच्या ताब्यात

हंसराज,प्रतिनिधी भंडारा लाखनी :- शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या विळख्यात अडकून दोन रानगव्यांचा (Indian Bison) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बलमाझरी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनविभागाने संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी लाखनी वनपरिक्षेत्रातील उमरझरी सहवनक्षेत्रातील बलमाझरी येथील खाजगी गट क्रमांक ३८८ व ३८६ च्या सीमेवर दोन रानगवे मृत अवस्थेत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक वनसंरक्षक (साकोली) संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी (लाखनी) नितेश धनविजय आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली.

वन्यप्राण्यांच्या मृतदेहांचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळाच्या पाहणीदरम्यान असे दिसून आले की, शेतमालक कुमार आनंदराव बनसोड याने पिकांच्या संरक्षणासाठी आपल्या शेतात बेकायदेशीररीत्या जिवंत विद्युत प्रवाह सोडला होता. याच तारांच्या संपर्कात आल्याने दोन्ही रानगव्यांचा जागीच मृत्यू झाला. वनविभागाने तपासादरम्यान शिकार करण्यासाठी वापरलेले लाकडी खांब, खुंट्या आणि सेंटिंगच्या तारा जप्त केल्या आहेत.

आरोपी कुमार बन्सोड याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, ५० आणि ५१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई भंडारा उपवनसंरक्षक योगेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय, क्षेत्र सहाय्यक पी.बी. ढोले आणि वनरक्षक सचिन राणे यांनी केली आहे.

वन्यप्राण्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा आहे. “शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अशा प्रकारे विद्युत प्रवाहाचा वापर करू नये. जर वन्यप्राण्यांमुळे पिकांचे नुकसान झाले असेल, तर ‘महाराष्ट्र वन्यप्राण्यांमुळे झालेली हानी नुकसान भरपाई अधिनियम २०२३’ नुसार वनविभागाकडे रीतसर अर्ज करून भरपाई मिळवावी,” असे आवाहन भंडारा वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

Popular Articles