यवतमाळ,दि. २५ : भारत सरकारच्या मेरा युवा भारत युवा कार्यक्रम विभागाच्यावतीने शहरालगत असलेल्या मुलांची निर्सग शाळा ऊबंटु इंग्लीश स्कुल येथे एक पेड मॉ के नाम कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
मुलांना निर्सगाबद्दल प्रेम व वृक्षलागवड करुन निर्सगाचा समतोल राखण्याकरीता लहान वयात सवय लागावी आणि आपल्या आईच्या नावाने एक झाड लावून त्याची जोपासना करता यावी यासाठी एक पेड मॉ के नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील चिमुकल्या मुलांनी वृक्ष दिंडी काढून चिमुकल्या हातांनी वृक्षारोपण केले. रॅलीमध्ये एक पेड़ माँ के नाम, झाडे लावा झाडे जगवा, कावळा करतो काव काव, माणसा माणसा झाडे लाव अशा प्रकारच्या म्हणी म्हणत जनजागृती करुन मोठ्या प्रमाणावर शाळेच्या परिसरात तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजुला कडुलिंबाची झाडे लावून निर्सगाचा समतोल राखता यावा या करीता सहभाग घेतला.
शाळेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. बालपणामध्ये विद्यार्थी जीवनात जे संस्कार दिले जातात ते मनामध्ये कोरले जातात. आपल्या वाढदिवसाला किंवा आपल्या घरातील कुणाच्याही वाढदिवसाला कोणतेही गिफ्ट न देता एक वृक्ष भेट देवून ते आपल्या आईच्या नावाने आपल्या घराच्या परिसरात किंवा इतर सार्वजनिकस्थळी लावून आपल्या आईच्या नावाने त्या वृक्षाची जपवणूक करावी, असे यावेळी शाळेचे अध्यक्ष पांडुरंग खांदवे यांनी सांगितले.
कार्यक्रमाकरीता मेरा युवा भारत कार्यालयाचे अनिल ढेंगे, ऊबंदु इंग्लीश स्कुलचे अध्यक्ष पांडूरंग खांदवे, संभजी राणे, उपाध्यक्ष शुभांगी बोरखडे, निखील आडे, समन्वय अक्षय शहाडे, क्रिडा शिक्षक अश्विन यादव, आर्ट शिक्षक नरेंद्र पाटणे, संगीत शिक्षक सुधाकर वासनिक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी अनिल ढेंगे, मनिष आडे, रवि शेळके व शाळेने सहकार्य केले.




