spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’

· आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे विविध उपक्रम; शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि मूलभूत सुविधांवर विशेष भर

· ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विशेष मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची विशेष मुलाखत प्रसारित करण्यात येत आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार, दि.१६, आणि मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन सुषमा जाधव यांनी केले आहे.

महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :

ट्विटर (X) : MahaDGIPR

फेसबुक : MahaDGIPR

यूट्यूब : MaharashtraDGIPR

आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपत त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, वनहक्क, पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच आदिवासीबहुल आणि दुर्गम भागांतील पायाभूत सुविधांचा विकास या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी कुटुंबांना दिलासा देणे, त्यांच्या उपजीविकेची साधने सुरक्षित ठेवणे, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच पिण्याचे पाणी आणि अन्नसुरक्षेच्या उपाययोजनांनाही महत्व देण्यात येत आहे.

भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा, जल-जंगल-जमिनीवरील हक्कांसाठी केलेला संघर्ष आणि आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी दिलेला संदेश आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत आदिवासी समाजाची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आणि अस्मिता जतन करण्यासोबतच विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व विषयांच्या अनुषंगाने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाचे प्रयत्न, विविध योजनांची अंमलबजावणी, दुष्काळसदृश परिस्थितीतील उपाययोजना आणि आगामी विकासाचे नियोजन याबाबत मंत्री डॉ. उईके यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.

Popular Articles