spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ट्रम्प हरले, ट्रम्प जिंकले !

मनमानी आयातशुल्क रोखणार्‍या निकालाने खुद्द अमेरिकेत मोठा गोंधळ उडणारच; पण आपल्यासारख्या देशांनाही त्याची झळ बसू शकते…

स्वत: मरण्यास तयार असणारा आत्मघातकी मारेकरी आणि व्यवस्थेस कोलवून स्वत:स हवे ते करू पाहणारा नेता यांना कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आयातशुल्क मनमानी पूर्णपणे बेकायदा ठरवली असली तरी त्यामुळे ट्रम्प बदलतील असे नाही. शक्यता ही की ते सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवलेल्या मार्गास वळसा घालून आयातशुल्क वाढवण्याचा अन्य, आणि अधिक कटकट्या, मार्ग शोधून काढतील. तेव्हा अमेरिकेत जे काही झाले त्याचे दुहेरी विश्लेषण आवश्यक. ट्रम्प आणि त्यांची अध्यक्षपदाची दुसरी खेप हा एक भाग आणि त्याचे जगावर, विशेषत: आपल्यावर, होणारे परिणाम; हा दुसरा.

प्रथम अमेरिकी सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन. सर्वोच्च सत्ताधीशाविरोधात भूमिका घेता येते, त्याची कृती घटनाबाह्य् ठरवता येते हा अलीकडे अशक्य वाटेल असा निर्णय त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. वास्तविक अन्यांप्रमाणे त्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाबाबतही आशावादी राहावे असे काही नव्हते. ट्रम्प यांच्या जवळपास प्रत्येक कृतीस मम म्हणण्यापलीकडे त्या न्यायालयाकडून काही घडत नव्हते. त्यात अमेरिकेत न्यायालयीन नेमणुका पक्ष/विचार निष्ठेवरून होतात. म्हणून ट्रम्प यांनी नियुक्त केलेले न्यायपीठ त्यांच्या विरोधात काही भूमिका घेईल ही अपेक्षा व्यर्थ होती.

सर्वोच्च न्यायालयातील बहुतांश न्यायाधीश हे मागास परंपरावादी आहेत. त्यामुळे गर्भपात, स्थलांतरित आदी मुद्द्यांवर त्यांची भूमिका किमान शहाणपणाचीही नाही. अशा परिस्थितीत हे न्यायालय ट्रम्प यांच्यासारख्या दांडगट अध्यक्षाविरोधात काही भाष्य करेल, याची अपेक्षा कोणास नव्हती. पण एका मुद्द्यावर तरी राज्यघटनेचा व्यापक अर्थ लावताना त्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प दबाव झुगारून दिला. म्हणून त्यांचे अभिनंदन.

‘‘आणीबाणीच्या परिस्थितीत कोणा देशाकडून वाढीव आयातशुल्क आकारण्याचा अधिकार अध्यक्षास सर्वसामान्य परिस्थितीत नाही; सबब मनाला आले म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर देशोदेशांवर ट्रम्प आयातशुल्क वाढवण्याचा निर्णय एकट्याने घेऊ शकत नाहीत. त्या निर्णयास अमेरिकी लोकनियुक्त सभागृहांचे- काँग्रेसचे- अनुमोदन आवश्यक’’ असा हा निर्णय. तो सहा विरुद्ध तीन अशा मताधिक्याने दिला गेला. म्हणजे एकतृतीयांश न्यायाधीशांनी ट्रम्प यांनी जे केले ते रास्त आहे असे मत व्यक्त केले.

साहजिकच हे तीन न्यायाधीश ‘महान’, ‘देशप्रेमी’ आहेत आणि सरन्यायाधीश ‘देशद्रोही’, ‘मालकाच्या मांडीवरील कुत्र्यासारखे आज्ञाधारक’ (लॅपडॉग्स) आणि ‘परदेश-धार्जिणे’ आहेत अशी लाखोली या निकालावर ट्रम्प यांनी आपल्याच देशाच्या न्यायाधीशांस वाहिली. अशा नेत्यांकडून हे तसे नेहमीचे. म्हणून सरावाचेही. त्याचे आश्चर्य नाही. आश्चर्य हे की इतकी टीका केल्यानंतरही अध्यक्ष ट्रम्प ‘‘मी हे आदेश पाळणार नाही’’, असे म्हणू शकले नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा लागणार. तो करत असताना आपण आपला आयातशुल्क वाढीचा हेका कसा चालूच ठेवू हे त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने आपला आयातशुल्क वाढीचा अधिकार अमान्य केलेला नाही; ज्या कलमांतर्गत मी हे केले ते त्यांना मंजूर नाही, असे सांगत ट्रम्प यांनी अन्य मार्गांनी आपण आयातशुल्क वाढ करत राहणारच हे पुरेसे स्पष्ट केले. आता यामुळे होऊ घातलेल्या दुहेरी परिणामांविषयी. दुहेरी याचे कारण खुद्द अमेरिकेतही या निकालाने मोठा गोंधळ उडणार असून त्याचवेळी आपल्यासारख्या देशांनाही त्याची झळ बसणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.