हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले आहे. खापा मांगली शिवारात पहाटे ५:०० वाजताच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यात पोलिसांनी सुमारे पावणेतीन किलो गांजा, वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण २ लाख ९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खापा मांगली परिसरातून गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती तुमसर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने पहाटे सापळा रचून संशयित हालचालींवरून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून तपासणी केली असता अक्षय नागसेन गजभिये (वय २७) आणि आर्यन चोपराम मेश्राम (वय २१, दोघेही रा. परसोडी/जवाहरनगर, ता. जि. भंडारा) यांच्या ताब्यातून १ लाख ३४ हजार २५० रुपये किमतीचा २.७७० किलोग्रॅम गांजा (निव्वळ २.६८५ किलो), ६० हजार रुपये किमतीची सुझुकी बर्गमॅन मोपेड दुचाकी (एम.एच.-३६ ए.पी.-२५२३) तसेच १५ हजार रुपये किमतीचे दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण २ लाख ९ हजार २५० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (NDPS Act, कलम ८(क), २०(ब) ii (ब), २९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गांजा कुठून आणला, याचा मुख्य पुरवठादार कोण आणि ही साखळी कुठेपर्यंत पसरलेली आहे, याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी तेजस सारडा व ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, सपोनि किशोर घोडेस्वार, पोलीस अंमलदार अजय बावणे, निखिल बिसने, राजू गिरेपुंजे आणि महेश नैताम यांनी केली. दरम्यान, अमली पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे व संशयास्पद हालचालींची माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






