spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पांढरकवडा पोलीस ठाण्यातील दोन हवालदारांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

– विशेष मोहिमेत बजावली उत्कृष्ट कामगिरी

पांढरकवडा :- यवतमाळ जिल्हा पोलीस दलातील कर्तव्यदक्षता आणि चिकाटीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. पांढरकवडा पोलीस ठाण्यांतर्गत विशेष पथकात कार्यरत असलेल्या दोन पोलीस हवालदारांनी आपल्या कौतुकास्पद कामगिरीने जिल्ह्याचा मान उंचावला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोलाचे योगदान दिल्याबद्दल पोलीस हवालदार उमेश कुमरे आणि गुणवंत मडावी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या विविध मोहिमांमध्ये पांढरकवडा पोलिसांनी आघाडी घेतली होती. यामध्ये दोन प्रमुख विभागांत या कर्मचाऱ्यांनी विशेष छाप पाडली, पोलीस हवालदार उमेश कुमरे (ब.नं. २१९५): यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘हरविलेल्या व्यक्तींचा शोध’ घेण्याच्या मोहिमेत अत्यंत चिकाटीने काम केले. तांत्रिक बाबी आणि स्थानिक नेटवर्किंगचा वापर करून त्यांनी अनेक व्यक्तींचा शोध लावून त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. तर पोलीस हवालदार गुणवंत मडावी (ब.नं. १२७३): यांनी ‘मुद्देमाल निर्गती’ मोहिमेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. पोलीस ठाण्यातील प्रलंबित मुद्देमालाचा निपटारा करण्यासाठी त्यांनी केलेल्या नियोजित कामामुळे प्रशासकीय कामात सुसूत्रता आली.

यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो.से.) आणि अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाभ पोकळे (भा.पो.से.) यांच्या स्वाक्षरीने हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांची कर्तव्यपरायणता यवतमाळ जिल्हा पोलीस विभागासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रशस्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. क्षेत्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या मोहिमांमध्ये अशा प्रकारे कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळाल्याने पोलीस दलात उत्साहाचे वातावरण आहे. पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या शिरपेचात या निमित्ताने मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून उमेश कुमरे आणि गुणवंत मडावी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular Articles