– पहिल्यांदाच बचावले पण दुसऱ्यांदा दोघेही ठार
– सोशल मीडियावर पटली दोघांची ओळख
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कट्टा शिवारात सोमवार (दि.२३) सायंकाळी ५ चा सुमारास दुचाकी रस्त्याकडेच्या दुभाजकावर धडकून भीषण अपघात झाला. या घटनेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून यात एकाचा घटनास्थळीच तर दुसऱ्यांच्या उपचारांला नेत्यांना वाटेत मृत्यू झाला. पुनीत उर्फ साजन इमरतलाल कुडोपा (२७, रा. भमोडी-घनसोर, जि. सिवनी, मध्यप्रदेश) व मोहित रामू खोडकर (३० रा. साडगाव- पालांदूर, ता. लाखनी, जि. भंडारा) अशी मृतांची नावे आहेत. पुनीत आणि मोहित दोघेही मित्र असून, ते नागपूर शहरातील मानेवाडा भागात किरायाने राहायचे. पुनित टाइल्स बसविण्याचे तर मोहित वाहन चालक म्हणून काम करायचा. पुनितच्या नातेवाईकाकडे कार्यक्रम असल्याने दोघेही सिवनीकडे जात होते. सिवनीला जाण्यासाठी नातेवाइकाला एमएच-३६/एएस-७४६० क्रमांकाची मोटरसायकल मागितली होती. मनसर (ता. रामटेक) परिसरात मोटरसायकल स्लीप झाल्याने दोघेही खाली कोसळले व जखमी झाले. त्यांच्यावर मनसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी नागपूरला जाण्याचा सल्ला दिला असताना दोघेही त्याच मोटरसायकलने नागपूरऐवजी सिवनीच्या दिशेने निघाले. रामटेक तालुक्यातील कट्टा-रामनगर दरम्यान मोटरसायकल जोरात दुभाजकावर आदळली. यात पुनितचा घटनास्थळीच तर मोहितचा नागपूरला उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले होते. याप्रकरणी देवलापार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
सोशल मीडियावर पटली ओळख
अपघात होताच देवलापार पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांना ताब्यात घेतले. गंभीर दुखापतीमुळे दोघेही शुद्धीवर नसल्याने ते त्यांची नावे व पत्ता सांगू शकत नव्हते. शिवाय, त्यांच्या खिशात ओळख सांगणारा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे पोलिसांनी या अपघाताची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली आणि काही वेळाने त्यांची ओळख पटली. तोपर्यंत दोघांच्याही मृतदेहांची उत्तरीय तपासणी प्रक्रिया आटोपली होती. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या सुपूर्द केले.




