spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पलाडी परिसरातील १० गावांसाठी राष्ट्रीय महामार्गावर ‘अंडरपास’ मंजूर; नितीन गडकरींनी दिला २० कोटींचा निधी

– रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) पाठपुराव्याला यश; प्रवासातील अडथळा दूर होणार

हंसराज भंडारा :- राष्ट्रीय महामार्गामुळे पलाडी आणि परिसरातील १० गावांतील नागरिकांना होणारी दळणवळणाची गैरसोय आता कायमची दूर होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या भागातील नागरिकांच्या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्गावर ‘अंडरपास’ मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी २० कोटी रुपयांचा निधी देखील निर्धारित करण्यात आला असून, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तर्फे असित बागडे यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन परिसरातील समस्यांचे निवेदन सादर केले. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामामुळे पलाडी आणि लगतच्या गावांचा संपर्क तुटल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती, तसेच रस्ता ओलांडताना अपघाताचा धोकाही वाढला होता. या समस्येचे गांभीर्य ओळखून मंत्री महोदयांनी तातडीने अंडरपासला मंजुरी दिली.

मेन पलाडी फाट्याबाबतही सकारात्मक चर्चा या भेटीदरम्यान, केवळ १० गावांसाठीचा अंडरपासच नव्हे तर ‘मेन पलाडी फाटा’ येथेही आणखी एका अंडरपासची गरज असल्याचे असित बागडे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीवरही गडकरी यांनी सकारात्मक चर्चा केली असून संबंधित बाबींचा गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

अधिकाऱ्यांना तातडीने कामाचे आदेश अंडरपासचे काम केवळ कागदावर न राहता ते प्रत्यक्ष जमिनीवर तातडीने सुरू व्हावे, यासाठी नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना तात्काळ दिल्या आहेत. या निर्णयामुळे पलाडी, टेकेपार, डोडा आणि परिसरातील हजारो नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

या भेटीवेळी मार्शल प्रफुल रामटेके व असित बागडे यांनी पुष्पगुच्छ देऊन मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत व आभार मानले. याप्रसंगी अरुण गोंडाणे, डॉ. सुनील जीवनतारे, मनोज बन्सोड यांच्यासह इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.

Popular Articles