spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चोरी

– पुण्यातील महिलेचे २० लाखांहून अधिक किमतीचे दागिने व रोकड लंपास

नागपूर :- वंदे भारत एक्सप्रेससारख्या प्रिमियम रेल्वेमध्ये चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजनी रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे जाणाऱ्या एका महिला प्रवाशाचे तब्बल २० लाख ७५ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ही घटना १० जून रोजी अजनी रेल्वे स्थानकावर घडली. पुणे येथील रहिवासी अंजली मुधोळकर (वय ६७) या गाडी क्रमांक २६१०२ अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-४ कोचमधील सीट क्रमांक २९ वरून पुण्याकडे प्रवास करण्यासाठी स्थानकावर आल्या होत्या. गाडीत चढताना मोठी गर्दी असल्याने त्याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील पर्स चोरून नेली. रेल्वेत आपल्या जागेवर बसल्यानंतर अंजली मुधोळकर यांना पर्स गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला घटनेची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, चोरी झालेल्या पर्समध्ये सुमारे २० लाख ७५ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच काही रक्कम होती.

वंदे भारत एक्सप्रेसमध्ये एवढ्या मोठ्या रकमेची चोरी झाल्याची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि लोहमार्ग पोलिस यंत्रणा सतर्क झाली. गाडी वर्धा रेल्वे स्थानकावर पोहोचताच आरपीएफच्या जवानांनी पीडित महिलेची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा अधिक तपास लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Popular Articles