– महाराष्ट्र पोलिसांकडून नोएडातून अटक
मुंबई/नोएडा :- विवाह जाहिरातींच्या माध्यमातून महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी विवाह करत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथून अटक केली आहे. या आरोपीने २५ हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुज कुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला २४ मे रोजी ग्रेटर नोएडा येथून ताब्यात घेण्यात आले. तो बनावट ओळख वापरून राहत होता. अजय अग्रवाल, अजय संतोष सिंह आणि जयप्रकाश रमेशचंद्र गुप्ता अशा विविध नावांनी तो महिलांशी संपर्क साधत असल्याचे तपासात उघड झाले आहे.
फ्लॅट विकून घेतले लाखो रुपये
मिरा-भाईंदर परिसरातील ७५ वर्षीय महिलेने नयानगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने वृत्तपत्रातील विवाह जाहिरातीच्या माध्यमातून तिच्या ४५ वर्षीय मुलीशी संपर्क साधला. त्यानंतर १ मार्च २०१९ रोजी दोघांचा विवाह झाला. लग्नानंतर आरोपीने नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन देत पीडित कुटुंबाला त्यांचा फ्लॅट विकण्यास प्रवृत्त केले. विविध हप्त्यांमध्ये त्याने तब्बल ८२ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे.
सोन्यासह फरार
फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपीने पीडित महिलेला नातेवाईकांच्या लग्नाचे कारण सांगून दिल्लीला नेले. तेथे रेल्वे स्थानकावर संधी साधून ३३ तोळे सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला. महिलेला मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत बसवून त्याने मोबाईल फोन बंद केला आणि फरार झाला. या प्रकरणात आरोपीने आई-मुलीकडून एकूण ९७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
दिव्यांग आणि असहाय महिलांनाही बनवले लक्ष्य
तपासादरम्यान आरोपीने अशाच प्रकारे २५ हून अधिक महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. यामध्ये दिव्यांग, मानसिकदृष्ट्या दुर्बल, घटस्फोटित तसेच असहाय महिलांचाही समावेश आहे. विवाहाचे आमिष, खोट्या आश्वासनांचा आधार आणि भावनिक विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपी महिलांकडून पैसे, दागिने आणि मालमत्ता हस्तगत करत होता.
फसवणुकीच्या पैशांतून घेतली आलिशान कार
फसवणुकीतून मिळालेल्या पैशांतून आरोपीने सुमारे २० लाख रुपयांची आलिशान कार खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. तसेच अमरावतीमधील २५ लाख रुपयांच्या फसवणुकीच्या आणखी एका प्रकरणातही तो वाँटेड असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महाराष्ट्र पोलिसांकडून सुरू असून, आणखी काही पीडित महिलांची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.







