नागपूर :- केंद्रीय परिवहन, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (ता.14) नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रभाग 8 मधील टीमकी येथे नव्याने तयार करण्यात येत असलेल्या चर्मकार समाज भवनाचे भूमीपूजन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार प्रविण दटके, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, माजी आमदार विकास कुंभारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, मनपा उपायुक्त गणेश राठोड, अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे, चर्मकार माता मंदिर व आखाडा पंच कमेटीचे अध्यक्ष सुभाष धापेकर, माजी नगर सेवक ॲड. संजय बालपांडे, अनिल मानापुरे, श्याम चांदेकर, पुरुषोत्तम फालके, प्रमोद दहीकर, अशफाक पटेल यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खासदार निधीतून टीमकी येथे रु.60 लाखांचे दोन मजली भव्य श्री. संत रविदास महाराज चर्मकार समाज भवनाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटनाप्रसंगी नितीन गडकरी यांनी श्री.संत शिरोमणी रविदास महाराज यांना अभिवादन केले आणि नागरिकांना समाज भवनाकरिता शुभेच्छा देत म्हणाले की, टीमकी भागात चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने राहतात. त्यामुळे नागरिकांच्या सर्वांगिण विकासासाठी समाज भवन तयार करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेत समाज भवनाकरिता खासदार निधीतून 60 लाख उपलब्ध करून दिले आहे. बांधकामात 25 टक्के निधीची बचत सुद्धा होणार आहे. या निधीचा उपयोग इमारतीवर सोलार पॅनल बसविण्याकरिता होऊ शकते. यामुळे विजेची बचत होईल व विजेचे बील कमी येईल. शिवाय समाज भवनात तयार होणाऱ्या हॉलचा उपयोग हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामाकरिता, महिलांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी,नागरिकांना वृत्तपत्र वाचनाकरिता तसेच परिसरातील नागरिकांच्या विकासासाठी भवनाचा उपयोग केला जावा अशी त्यांनी अपेक्षा केली. नागरिकांसाठी समाज भवन तयार होणार असल्याने त्याचा सांभाळ करावा, ते चांगले ठेवण्यात यावे आणि चांगल्या रितीने संचालित करावा आणि समाज भवन ही आपली संपत्ती असल्याचे समजून या संपत्तीचा सांभाळ करावा असेही ना. गडकरी यावेळी म्हणाले.




