नागपूर :- नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महारेलच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये 1505 कोटी रुपयांच्या होणार्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण उद्या, (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या तिन्ही समारंभाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी राहणार आहेत. शहरातील तीन ठिकाणी हे कार्यक्रम होणार असून गड्डीगोदाम चौकात सकाळी 10 वाजता, हरीहर मंदिर चौकात सकाळी साडेदहा वाजता तर लकडगंज पोलीस स्टेशनसमोर सकाळी 11 वाजता विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार कृपाल तुमाने, आमदार संदीप जोशी, आमदार डॉ. नितीन राऊत, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते व आमदार विकास ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नासुप्रचे सभापती संजय मिना, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. मनपाचे मुख्य अभियंता मनोज तालेवार व नासुप्रचे अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.
गड्डीगोदाम चौकात सकाळी 10 वाजता होणार्या कार्यक्रमात पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्र, दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ व उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच हरीहर मंदिरजवळ सकाळी साडेदहा वाजता होणार्या कार्यक्रमात मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ, दक्षिण नागपूर विधानसभा, पूर्व नागपूर विधानसभा तसेच कामठी विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार्या विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन होणार आहे.
महापालिकेची 560 कोटींची कामे
यात नागपूर महापालिकेच्या अंतर्गत 560 कोटी रुपयांची विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहेत. यात 430 कोटी रुपयांचे विविध विकास कामांचे भूमीपूजन होणार असून 130 कोटी खर्च करून झालेल्या विकास कामांचे लोकार्पण होणार आहे.
नासुप्रचे 510 कोटींची कामे
नागपूर सुधार प्रन्यासच्या निधीतून एकूण 510 कोटी रुपयांची कामे होणार आहेत. यात 335 कोटी रुपयांची विविध विकास कामांची भूमिपूजने होणार आहेत त्याचप्रमाणे 175 कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या विकास कामांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत.
त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संविधान चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत होणार्या 150 कोटी खर्चाच्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन तसेच महामेट्रोतर्फे बांधण्यात येत असलेल्या राम मंदिर ते प्रजापती चौक सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे. यावरही 150 कोटी रुपये खर्च होणार आहे. महारेलतर्फे 135 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या लकडगंज पोलीस स्टेशन ते वर्धमाननगर जुना भंडारा रोड उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या तिन्ही ठिकाणी होणार्या लोकार्पण व भूमिपूजन समारंभाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मनपा व नासुप्रतर्फे करण्यात आले आहे.








