spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महावितरणच्या लोकाभिमुख योजनांचा स्वातंत्र्यदिनी अभूतपूर्व जागर; 100 पेक्षा अधिक ठिकाणी जनजागृती मोहीम संपन्न

नागपूर/ वर्धा :- स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नागपूर परिमंडलात महावितरणतर्फे विविध जनहिताच्या व लोककल्याणकारी योजनांचा भव्य जागर करण्यात आला. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शंभरहून अधिक ठिकाणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थेट नागरिकांसोबत संवाद साधत आधुनिक व पारदर्शक योजनांची माहिती दिली.

संपुर्ण नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, नगर पालिका, बाजार समित्या आणि व्यापारी संकुलांमध्ये आयोजित या मोहिमेत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजना, मागेल त्याला सौर कृषिपंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि स्मार्ट मीटर योजनेवर विशेष भर देण्यात आला.

स्वातंत्र्यादिनानिमित्त कळमेश्वर उपविभागात काढण्यात आलेली जनजागृती बाईक रॅली या संपूर्ण उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली, मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता संजय वाकडे आणि कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, उपकार्यकारी अभियंता रोशन शेंदरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या बाईक रॅलीच्या ज्याच्या माध्यमातून महावितरणच्या लोककल्याणकारी योजनांचा संदेश थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला. तसेच, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजनेअंतर्गत घोगली (ता. कामठी) येथील लाभार्थी सचिन सोनारे यांच्या नेट मीटर कनेक्शनचा शुभारंभ महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. अनुसूचित जाती प्रवर्गांतर्गत केवळ 5 हजार रुपये भरून हा लाभ मिळाल्याबद्दल. सोनारे यांनी महावितरणचे आभार मानले.

कामठी तालुक्यातील घोगली ग्रामपंचायत येथे आयोजित विशेष ग्रामसभेमध्ये मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करत प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले, तर अधीक्षक अभियंता संजय वाकडे यांनी ग्राहकांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमादरम्यान घोगलीचे सरपंच राहुल सोनारे यांनी ग्रामस्थांना नैसर्गिक स्रोतांद्वारे तयार होणाऱ्या विजेचा वापर करण्याचे आवाहन केले आणि ग्रामपंचायतीच्या सहयोगाने मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात राबविलेल्या या जनजागृती मोहीमेत नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक, अधीक्षक अभियंता संजय वाकडे व प्रफुल लांडे, वर्धा येथील अधीक्षक अभियंता स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता सुधीर हेडाऊ, तसेच नागपूर व वर्धा जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय व शाखा अभियंता, महावितरणचे कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी महावितरणच्या या आधुनिक व पारदर्शक योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरण प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.