खापा,वार्ताहर :- पी. एम. श्री. नगर परिषद राजेंद्र हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे (दि.२८) शनिवारला राष्ट्रीय विज्ञान दिन आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस महान भारतीय शास्राज्ञ सी.व्ही. रमण यांनी शोधलेल्या रमण परिणामच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या दिवशी विज्ञानाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोण निर्माण व्हावा, हा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी शाळेत न. प. अध्यक्ष पियुष बुरडे, न.प. उपाध्यक्ष सुनिल पाहुने, शिक्षण सभापती अंजली मेनकुदळे, प्रशासन आधकारी मुकेश वाहणे, व्यवस्थापन समिती सदस्य रंभाळ, ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका निता चामाटे, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक असलम खान, शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शाळेत विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्त्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यांचा समावेश होता. तसेच याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्स व चार्ट्सचा समावेश होता. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे विविध स्पर्धा तसेच विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. उपस्थित पाहुण्यांनी विज्ञान प्रदर्शनी, रांगोळ्या, चित्रे यांचे अवलोकन करून विदयाथ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे नियोजन ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका चामाटे यांनी केले व मार्गदर्शन मुख्याध्यापक नेहारे व शिक्षक खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेतील शिक्षिका गजभिये, सांडे, खोब्रागडे, मडके, सावनकर, सुरजुसे, पराते, रंभाड, नंदेश्वर, शिक्षक बावनकुळे, भांगरे यांनी सर्वतोपरी सहकार्य केले.
याप्रसंगी न.प. अध्यक्ष पियुष बुरडे यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात रुची वाढविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री सांडे यांनी केले. तसेच आभारप्रदर्शन पर्यवेक्षक खडसे यांनी केले.
अशाप्रकारे राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय आनंदान व उत्साहात साजरा करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड व जिज्ञासा वाढण्यास मदत झाली.








