यवतमाळ :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दि. 27 ऑक्टोबर ते दि. 2 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा होत असून, नागरिक सतर्कता बाळगून गैरव्यवहाराला प्रतिबंध करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी केले आहे.
“दक्षता आपली सामायिक जबाबदारी” (Vigilance: our Shared Responsibility) हे या वर्षीच्या सप्ताहाचे घोषवाक्य आहे. आपल्या देशाच्या आर्थिक, सामाजिक प्रगतीमध्ये गैरव्यवहार हा मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचार निर्मुलनासाठी सरकार, नागरिक आणि खासगी क्षेत्र यांनी एकत्रित येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने सावध राहायला पाहिजे आणि सदासर्वदा प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठा यांच्या मानकाबाबत वचनबध्द असायला हवे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ जिल्हयात कार्यरत असून भ्रष्टाचाराविरुध्द सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी म्हणजेच लोकसेवक व लोकप्रतिनिधी यापैकी कोणी लाच मागणी करित असेल, भ्रष्टाचारी मार्गाने अपसंपदा जमा केली असेल, पदाचा दुरुपयोग करुन कार्यालयीन भ्रष्टाचार करित असेल तर प्राप्त तकारीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडुन कायेदशीर कार्यवाही करण्यात येत असते. तरी भ्रष्टाचारासंबंधाने काही तकार अथवा माहिती असल्यास कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, यवतमाळ या कार्यालयाशी संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता : पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, तहसील कार्यालयासमोर टांगा चौक, दगडी इमारत, यवतमाळ (दूरध्वनी क्रमांक टोल फ्री क्रमांक – १०६४ फोन क्र. ०७२३२ – २४४००२ मोबाईल क्रमांक- ८९७५७९१०६४ ईमेल आयडी dyspacbytl@gmail.com किंवा dyspacbyavatmal@mahapolice.gov.in)




