spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कान्होलीबाऱ्यात ग्रामस्थांचा ओव्हरलोड ट्रक अडवून”रास्ता रोको” 

हिंगणा :- तालुक्यातील सिंगारदीप रिठी भागातील खदानी मधून रेती, गिट्टी व मुरूम वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड ट्रकांमुळे रस्त्यांची अक्षरशः वाट लागल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी आज (२९)कान्होलिबारा येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन करून हे ट्रक अडविले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरू होते नायब तहसीलदार नीतीन गोहणे व नायब तहसिलदार ब्रम्हे यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सिंगारदीप रिठी भागात खदानी आहेत येथून दररोज मोठे ट्रक निघून कान्होलिबारा गावातून टाकळघाट मार्गे पुढे बुटीबोरी एमआयडीसी कडे जातात .या अवजड आणि ओव्हरलोड वाहनांमुळे ग्रामीण भागातील छोट्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. या भागातील ग्रामस्थांना आपली छोटी दुचाकी-चारचाकी वाहने या रस्त्यावर नीट चालवता येत नाहीत. याबाबत वारंवार तक्रारी करून सुद्धा याकडे संबंधित विभाग लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांनी आज दुपारी एक वाजताच्या सुमारास रस्त्यावर उतरून ट्रक अडवून धरले. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

आंदोलनस्थळी मनसेचे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर, गणेश बरवटकर, उद्धव ठाकरे गटाचे प्रकाश काकडे यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले होते.

ट्रक वाहतूकदार यांच्यावर प्रशासनाची मेहरनजर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळेच वारंवार तक्रारी करूनही ओव्हरलोड वाहतुकीवर कारवाई होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनात सहभागी ग्रामस्थांनी “रस्ते उद्ध्वस्त, प्रशासन मस्त” अशा घोषणां दिल्या. नायब तहसीलदार नितीन गोहने, ब्रम्हे तसेच महसूल विभागाचे अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात तीव्र शाब्दिक चकमक सुरू असतानाच संबंधित वाहनांच्या रॉयल्टीची तपासणीही सुरू करण्यात आली.

ग्रामस्थांनी या ओव्हरलोड वाहनांवर कार्यवाही करावी.रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Popular Articles